Lok Sabha Election 2019; लग्नसराईला आचारसंहितेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 01:50 PM2019-03-27T13:50:23+5:302019-03-27T13:52:03+5:30
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. याचा फटका एप्रिल, मे महिन्यात होणाऱ्या लग्नसराईला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लग्नाच्या खरेदीसाठी सोबत मोठी रक्कम ठेवणे डोकेदुखी ठरू शकते. यासाठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे. वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. आचारसंहितेनुसार १० हजारांहून अधिक रक्कम सोबत बाळगल्यास त्याबाबतची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता योग्य कागदपत्रे सादर केल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. मात्र, कागदपत्रे नसल्यास त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल. योग्य कागदपत्रे नसल्यास रक्कम जप्त करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून अनेक नागरिक खरेदीसाठी येतात.
लग्नासाठी सोने, कपडे, भांडी, खरेदीसाठी मोठी रक्कम सोबत घ्यावी लागते. यावेळी आगामी दोन महिने अशी मोठी रक्कम बाळगताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. अधिक रक्कम असल्यास बॅँकेतून काढल्याची पावती अथवा एटीएम मधून घेतल्याची पावती सोबत ठेवावी लागणार आहे. सामान्य लग्नाबाबत परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परंतु लग्नाला राजकीय नेते उपस्थित राहणार असतील तर खबरदारी घ्यावी लागेल.
एप्रिल, मे महिन्यात १९ मुहूर्त
एप्रिल व मे महिन्यात एकाचवेळी लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि लग्नसराईची झुंबड उडणार आहे. दोन महिन्यांत १९ विवाहमुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये १७,१८,२२,२४,२६,२७ व २८ तर मे महिन्यात ७,८,१२,१७,१९,२१,२३,२६,२९,३०,३१ रोजी विवाहमुहूर्त आहेत.
खरेदीसाठी जाणाऱ्यांना फटका
आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर नाके उभारले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. खरेदीसाठी सोबत घेतलेल्या पैशाबाबतची कागदपत्रे अधिकाऱ्यांना सादर करावी लागतील, यात संबंधिताला मनस्ताप सहन करावा लागू शकतो.