Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 08:17 PM2019-04-06T20:17:30+5:302019-04-06T20:20:22+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. चारूलता टोकस यांना जाहीर सभेत भाषण देण्यास काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी रोखले, याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राहुल गांधींनीही महिलांच्या उपस्थितीबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. परंतु, काँग्रेसच्या उमेदवार महिला असूनही या जाहीर सभेत त्या एक शब्दही न बोलल्याने महिलांचा हिरमोड झाला. या कसल्या शिक्षित उमेदवार, अशी प्रतिक्रिया या सभेतून परतणाऱ्या अनेक महिलांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. चारूलता टोकस या गुडगाव (हरियाणा) येथे १९९१ पासून राहतात. संपूर्ण कुटुंब येथे स्थायिक झाले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रातही गुडगाव, मुंबई येथील बंगल्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हापूर (राव) या गावात शेती असल्याचे नमूद करीत येथील पत्ता त्यांनी दिला आहे. उमेदवार बाहेरचा असल्याने आधीच मतदारसंघात काँग्रेसला प्रचारात कमालीची अडचण जात आहे. त्यामुळे माहेरकडील जातीचा आधार घेत कार्यकर्ते प्रचारात आहेत. मात्र, उमेदवार राहतो कुठे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांना अजूनही देता आलेले नाही. राहुल गांधींच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते मतदारांना याचे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये आमदार अमर काळे यांना भाषणाची संधी पक्षाकडून देण्यात आली. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. उमेदवाराच्या वास्तव्याबाबत त्यांनीही चकार शब्द काढला नाही. उमेदवार स्वत: जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असतो, त्याशिवाय निवडणुकीची सभा होऊच शकत नाही. मात्र, उमेदवाराने जाहीर सभेला संबोधित न केलेली भारताच्या निवडणूक इतिहासातील ही पहिलीच जाहीर सभा असावी, असा आता प्रचार होऊ लागला आहे.
रणजित कांबळेंकडून दुखावलेले एकवटले
प्रभाराव यांच्यानंतर मागील १५ वर्षांपासून रणजित कांबळे यांच्याकडे अबाधित सत्ता आली. जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कांबळे यांनी जिल्ह्यातील सहकार गटाची वाताहात करून टाकली. ज्येष्ठ सहकार नेते व शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांनी जपलेली शेकडो माणसे या सहकार क्षेत्रात कार्यरत होती. सहकार गटाचा दबदबा संपविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रणजित कांबळे व त्यांचे समर्थक इमाने-इतबारे करीत आहे. आता त्यांचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे, अशी भावना सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचाच राग युवा नेते समीर देशमुख यांना असल्याने त्यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. समीर देशमुखांचे खंदे समर्थक असलेले सुधीर पांगूळ यांनाही सहकार गटापासून तोडण्याचे काम कांबळे यांनीच केले, याची जाणीव या गटातील कार्यकर्त्यांना आहे. त्याचा सर्व हिशेब गोळा-बेरजेसह घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.