महाराष्ट्रातील जनतेचा महायुतीला भक्कम आशीर्वाद, वर्धा येथील सभेआधी मोदींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:30 AM2019-04-01T07:30:42+5:302019-04-01T09:50:11+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पंतप्रधान मोदींची पहिली प्रचार सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेना युतीचा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 सभा होण्याची शक्यता आहे. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आज वर्धा येथे प्रचारासाठी येणार आहेत.
महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या मतदानादरम्यान प्रत्येक टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 सभा आयोजित करण्याचा राज्यातील भाजपा नेत्यांचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई येथेही जाहीर सभा होणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही व्यासपीठावर उपस्थित असणार असल्याची माहिती मिळत आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे यंदा सुद्धा राज्यातील प्रचाराचा शुभारंभ वर्धा येथून होणार आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेआधी नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-आरपीआय महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील असा विश्वास व्यक्त केला.
केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(अा) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे! @BJP4Maharashtra@ShivSena
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 1, 2019
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यामध्ये पंतप्रधान सेवाग्रामला भेट देणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. महात्मा गांधी यांची कर्मभूमी म्हणून वर्धा देशात प्रसिद्ध आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या आई दिवंगत प्रभा राव या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या.
मागील निवडणुकीतही विद्यमान भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पूर्ण तयारी झाली असून, प्रचाराकरिता ५० हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते येणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.