ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहचेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:00 AM2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:47+5:30

जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च लोकवाहिनी असल्याने जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात तसेच जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये लोकवाहिन्या पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. 

Lokvahini did not reach the rural areas | ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहचेना

ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहचेना

Next
ठळक मुद्देतत्कालीन सरकारचे आश्वासन फोल : बसेसअभावी ग्रामिणांना बसतोय आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘नागरिकांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन सदैव चालणाऱ्या राज्य परिवहन महामंडळात पुरेशा बसेस उपलब्ध नसल्याने आजही जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘लोकवाहिनी’ पोहोचू शकत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारने वर्धा जिल्ह्यासाठी ५० नवीन बसेस देण्याची घोषणा केली होती. मात्र, ते आश्वासनही फोल ठरल्याचे दिसून येत आहे. 
जिल्ह्यात वर्धा, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्या.), हिंगणघाट असे एकूण पाच आगार आहेत. या पाचही आगार मिळून तब्बल २२८ बसेस रस्त्यावर धावतात. ५६५ चालक, तर ४७३ वाहकांच्या भरोशावर एसटीचा गाडा हाकणे सुरू आहे. मात्र, १३ लाखांवर असलेल्या लोकसंख्येसाठी केवळ २२८च लोकवाहिनी असल्याने जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात तसेच जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये लोकवाहिन्या पोहोचू शकत नसल्याचे चित्र आहे. 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गत वर्षीच्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. सर्व खासगी आणि शासकीय वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा कहर कमी झाल्याने हळूहळू राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू केली. त्याअनुषंगाने पाचही आगारातील एकूण २१० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. एसटीतून दररोजचे उत्पन्न २० लाखांपर्यंत पोहोचले. मात्र, आता शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. सध्या पाचही आगारातून २२८ बसेस सुरू आहे.
 मात्र, अखेरच्या टोकापर्यंत लोकवाहिनी पोहचविण्यासाठी आणखी २० ते २५ नव्या बसेसची गरज असल्याचे परिवहन महामंडळाकडून सांगण्यात आले. तत्कालीन फडणवीस सरकारने एसटी महामंडळाला नव्या ५० बसेस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तापालट होताच ते आश्वासनही हवेत विरल्याचे दिसून आले त्यामुळे आहे त्याच बसगाड्यांवर प्रवाशांची सेवा सुरू आहे. मात्र, अजूनही असे काही गावे आहेत की तेथील नागरिकांना अजूनही लालपरीचे दर्शन झाले नाही. त्यामुळे बसेसची उपलब्धता वाढविण्याची गरज आहे. अनेक रस्त्यांवरून बसेस धावत असताना अचानक बंद पडत असल्याने  नव्या बसेसची गरज निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांचे होताय शैक्षणिक नुकसान... 
जिल्ह्यात परिवहन मंडळाची बससेवा हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने अजूनही जिल्ह्यातील अनेक गावांत लोकवाहिनी पोहोचत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

गावात पहिल्यांदाच झाले गावकऱ्यांना बसचे दर्शन
जिल्ह्यातील अनेक गावे असे आहेत की, जेथे अजूनही बस पोहोचली नसून गावकऱ्यांना लालपरीचे दर्शन दुर्लभ झाले. मात्र, काही गावांमध्ये पहिल्यांदाच लालपरी पोहोचल्याने नागरिकांनी परिवहन मंडळाचे आभार मानले. लालपरी गावात पोहोचल्यानंतर नागरिकांनी चालकासह वाहकाचा सत्कार केला. एसटी बस गावात पाेहोचल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

 

Web Title: Lokvahini did not reach the rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.