अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 05:00 AM2022-06-23T05:00:00+5:302022-06-23T05:00:11+5:30
आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती.
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५१५.२७ मिलीमीटरच पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अल्पपर्जन्यमान असतानाही कृषी विभागाकडून जिल्ह्यात ४२ हजार ६९४ हेक्टरवर म्हणजेच एकूण नियोजनाच्या १० टक्के पेरण्या झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असून जिल्ह्यात सध्या तरी ५० टक्केच्या आसपास पेरण्या आटोपल्या आहे. पावसाचाही पत्ता नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढविण्याची दाट शक्यता आहे.
आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती. परंतु यावर्षी केवळ ७.७२ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१५.२७ मिलीमीटर तर सरासरी ६४.४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अजूनही सर्वदूर माॅन्सून बरसला नसतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक असून आता आकाशाकडे नजरा लागल्या आहे.
कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो...
- या वर्षी पावसाने चांगलाच विलंब केल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय लागवड करु नका, असे सांगण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी या आवाहनाला खो देत लागवड केल्याने कृषी विभागही वैतागला आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपासून थांबविण्याकरिता कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाणार असल्याचे सांगत आहे.