लोणीच्या महिलांचे एलईडी दिवे बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:50 PM2018-01-08T23:50:24+5:302018-01-08T23:50:58+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून गावांना आथिक सक्षम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. या अंतर्गत लोणी या गावातील महिलांना स्वयंरोजगारासाठी एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षित महिलांनी अल्पावधीतच ३०० एलईडी दिवे तयार केले असून ३० टक्के दिव्यांची विक्रीही झाली आहे.
शेतीला पुरक व्यवसायाची जोड देणे, शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन प्रत्येक गावाचा विकास करणे हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन सुरू केलेल्या या उपक्रमातून लोणी येथील महिलांना गावातच रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यांची वाटचाल लघु उद्योजक बनण्याकडे होत आहे.
राज्यातील मागासलेली गावे विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक हजार खेडी विकसित करण्यात येत आहे. व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना याकरिता करण्यात आली आहे. यातील उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी यासाठी ग्राम सामाजिक परिवर्तकांची नेमणूकही करण्यात आली आहे.
लोणी या गावात कापूस आणि सोयाबीन हे दोन पीक घेतले जाते. त्यातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नसल्याने गावातील विशेष करून महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात शेतीपूरक व्यवसायाची कमरतरता आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाणही अधिक आहे. या सर्व समस्यांचा विचार करीत गावात व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनच्या ग्राम परिवर्तकांच्या साह्याने विविध विकास उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लोणी या गावातील बचत गटाच्या १४ महिलांना एलईडी दिवे व पथदिवे तयार करण्याचे १२ दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात सहभागी महिलांनीही प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रकारचे एलईडी दिवे व ग्रा.प. ला लागणारे पथदिवे तयार केले. तयार करण्यात आलेल्या ३०० एलईडी दिव्यांपैकी ९० दिव्यांची विक्रीही झाली आहे. सदर दिवे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व्हीएमटीएमच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आला. प्रशिक्षणासाठी शक्ती इलेक्ट्रिकचे विशेष सहकार्य लाभले. या प्रशिक्षणातून आत्मनिर्भर झाल्या असून त्यांचा स्वतंत्र व्यवसाय सुरू झाला आहे. याचा लाभ त्यांच्या आर्थिक उन्नतीकरिता होणार असल्याच्या प्रतिक्रीया त्यांना सहकार्य करणारे देत आहेत.
कुटुंबातील कर्त्याला हातभार
संकल्पनेतून सुरू केलेल्या या व्यवसायामुळे महिलांचा आत्मविश्वास तर वाढलाच असून त्या सध्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी हातभार लावत आहेत. महिला सशक्तीकरण व विद्युत बचतीचे धडेही गावात गिरवले जात आहेत. गावाला एक आदर्श गाव कसे बनविता येईल यासाठीची ही वाटचाल फायदाची आहे. लोणी येथील हा उपक्रम इतर गावांना प्रेरणा देणारा ठरत आहे.
ग्रामीण भागातील महिला ज्या खुरपी व टोपली घेऊन शेतात काम करतात किंवा शेळी हाकतात त्याच महिला आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एलईडी दिवे तयार करत आहेत. या महिला सध्या केवळ एलईडी दिवे बनवित नसून त्यांची वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे होत आहे. सदर उद्योगातून त्यांनी फक्त स्वत:चा नाही तर आजूबाजूची खेडे देखील प्रकाशमय करण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना परवडेल अशा दरात या महिला एलईडी दिव्यांची विक्री करीत आहेत.
- देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक, उमेद.