४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून गुन्हेगारांवर नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:36 AM2017-07-20T00:36:02+5:302017-07-20T00:36:02+5:30

शहराची सुरक्षितता व सुव्यवस्थेचे गुणात्मकरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा प्रभावी उपयोग जगभरात केला जात आहे.

Look at the criminals from 48 CCTV cameras | ४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून गुन्हेगारांवर नजर

४८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून गुन्हेगारांवर नजर

Next

शहरातील १४ मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे : नऊ महिला सांभाळतात नियंत्रण कक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहराची सुरक्षितता व सुव्यवस्थेचे गुणात्मकरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा प्रभावी उपयोग जगभरात केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासन मुंबई शहरासोबतच इतर शहरांमध्येही सीसीटीव्ही लावण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवित आहे. वर्धा शहरातील ४८ सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून शहरातील लहानमोठ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
शहरातील १४ महत्त्वपूर्ण जागेवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या थेट प्रक्षेपणामुळे पोलिसांना शहरात कायदा व सुव्यव्यस्थेसह घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी व्हिडीओ फुटेज प्राप्त होत आहे. त्यामुळे गुन्हेगाराचा शोध घेण्यास, गुन्ह्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होत आहे. यासह शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणासाठी कॅमेरे उपयुक्त ठरत आहे.
शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांचा तिसरा डोळा बनला आहे. आतापर्यंत ८ गुन्ह्याच्या तपासात याची मदत झाली असून त्यातील एक खुनाच्या प्रकरणातील आरोपी ओळखण्यासाठी उपयुक्त ठरला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या धाकामुळे गुन्हेगारी कारवाया निश्चितच कमी होतील, असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे झालेले चित्रीकरण पाहणे, त्याचे विश्लेषण करणे, आवश्यक तिथे सूचना देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही सर्व्हेलन्स नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा नियंत्रण कक्ष नऊ महिला पोलीस कर्मचारी सांभाळतात. केंद्रप्रमुख म्हणून पोलीस निरीक्षक सांभाळतात. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहरातील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणालीचे माध्यमातून नागरिकांना सूचना देणे व मार्गदर्शन करून शांतता राखण्याबाबत सूचित करणे, अफवांना आळा घालणे ही कार्य करण्यात येत आहेत. या नियंत्रण कक्षातून शहरातील घडामोडीवर लक्ष ठेवणे सहज शक्य होत असून अवैध वाहतूक, चौकातील मारामारी, पार्किंग समस्येवर वेळीच आळा बसून अपघात टाळण्यासाठी सुद्धा सहायक ठरत आहे.
या कक्षाचा संपूर्ण वर्धा शहराला सुरक्षा देण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो यासाठी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन नियंत्रण कक्षाची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, कार्यकारी अभियंता शरद चौधरी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि कंट्रोल रूम इंचार्ज उपस्थित होते.
वर्धा शहरानंतर हिंगणघाट शहरातही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. हिंगणघाट शहरातील विविध वर्दळीचे चौक, शहरात येणारे मुख्य रस्ते, तसेच महामार्गावरील विविध ठिकाणी कॅमेरे लावणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Look at the criminals from 48 CCTV cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.