तत्काळ मदतीच्या काळात सर्वेक्षणाचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 09:59 PM2017-12-14T21:59:12+5:302017-12-14T21:59:50+5:30
तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : तालुक्यात ३२ हजार १०० हेक्टरवर क्षेत्रात बोंडअळीने नुकसान केले आहे. या अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून थेट मदतीची गरज असताना शासनाच्यावतीने सर्वेक्षणाचा देखावा होत आहे. यातही दिलेल्या दिवसात सर्वेक्षण कसे होईल हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक या तीन गावपातळी वरील अधिकारी शेताच्या बांधावर जावून प्रत्यक्ष सर्व्हे करणार आहेत. यात अंकगणीताची आकडेमोड करावी लागणार आहे. एका दिवशी किती शेताला भेटी देता येईल. या सात दिवसात येणाºया सुट्या पाहता प्रत्यक्षात पाच दिवस या सर्वेक्षण होणार आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने धरणाच्या पाण्याने चिखलमय झालेल्या पांदण रस्त्याने हे अधिकारी शेताच्या धुºयापर्यंत कसे पोहचतील हा संशोधनाचा विषय असून अपुºया कर्मचारी वर्गापुढे पाच दिवसात सर्वेक्षण करून अहवाल देणे ही तारेवरची कसरत ठरणार आहे.
प्रत्यक्ष सर्वेक्षण करुनच अहवाल
अडचणी असताना सुद्धा आमच्याकडे असलेल्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या कडून कमी दिवस असले तरी सर्वेक्षण होईल व ते करतील असा विश्वास आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतरच अहवाल तयार केला जाईल.
- महेंद्र सोनोने, तहसीलदार सेलू