लग्नासाठी कुंडली पाहता; मग आरोग्याची कुंडली का नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 04:45 PM2024-07-06T16:45:29+5:302024-07-06T16:46:19+5:30
जवळच्या नात्यात लग्न करू नका : आनुवंशिक आजारांचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विवाह जुळविताना आपण आधी आपली कुंडली जुळवीत असतो; पण आता आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व सिकलसेलमुक्त समाजनिर्मितीसाठी कुंडली जुळविण्यापेक्षा आरोग्यपत्रिका तपासून लग्न जुळवणे महत्त्वाचे आहे; कारण सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार असून हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जात असतो. त्यामुळे अशा आनुवंशिक आजाराचे समूळ उच्चाटन करायचे असेल तर विवाहापूर्वी आरोग्यकुंडलीही जुळविणे आता आवश्यक आहे.
सिकलसेल किंवा इतर कोणता - आनुवंशिक आजार असेल तर तो लपविला जाता कामा नये. सिकलसेल असल्यास नियमित आरोग्य तपासणी करून हिमोग्लोबिनची पातळी बरोबर ठेवण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करा. फॉलिक अॅसिडच्या गोळ्या नियमित घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो; परंतु अनेक व्यक्ती यांकडे दुर्लक्ष करतात. सिकलसेल आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती केली जाते.
आरोग्य तपासणीमध्ये काय पाहाल?
आरोग्य तपासणी : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांच्यामार्फत सिकलसेल सोलॅबिलिटी तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावपातळीवरील आरोग्यसेविका व आशासेविका यांच्यामार्फत रक्ततपासणी व समुपदेशन निःशुल्क करण्यात येत आहे.
सिकलसेल स्क्रीनिंग : जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाकडून सिकलसेल स्क्रीनिंगची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ही चाचणी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी करून देण्यात आली असून, व्यक्तींना त्या ठिकाणी जाऊन सिकलसेल स्क्रीनिंग करता येते.
नात्यात लग्न टाळायला हवे :
लग्न ठरविण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांची रक्ततपासणी करून घ्या.
दोघेही वाहक असतील तर एक वाहक एक ग्रस्त असेल तर किवा दोघेही ग्रस्त असतील तर त्यांच्या होणाऱ्या अपत्याला तो आजार होऊ शकतो. म्हणून असे विवाह टाळलेले बरे.
आरोग्यकुंडली का पाहिली जात नाही?
आता बदलत्या काळात जात, पात, धर्म व वंश पाहण्यापेक्षा आरोग्य कुंडली पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण ज्या व्यक्त्तीशी विवाह करतो, तो आजारी तर नाही ना, याची माहिती मिळेल.
- सूरज वानखेडे, युवक.
कुंडलीचे ३६ गुण जोडण्यापेक्षा आरोग्याचे गुण जुळल्यास आयुष्यभर जोडपे निरोगी राहतील व त्यातून त्यांचा आर्थिक विकासही होईल, यासाठी आरोग्यचाचणी करूनच विवाह करण्याची परंपरा सुरू करायला हवी.
- अंकित सोनुले, युवक.
सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार आहे. सिकल कॅरिअरच्या माध्यमातून हा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत जातो. तेव्हा सिकलसेलचे जर समूळ उच्चाटन करायचे असेल तर विवाहयोग्य मुलामुलींची सिकल स्क्रीनिंग करावी. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.
- डॉ. अरविंद दुबे, वर्धा.