सावकारी कर्जमाफीनंतरही सावकाराकडून व्याजाची लूट
By admin | Published: September 11, 2015 02:34 AM2015-09-11T02:34:56+5:302015-09-11T02:34:56+5:30
शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या धोरणात्मक कार्यक्रमाला खाजगी सावकराकडून मुठमाती दिली जात आहे.
शासकीय धोरणाची एैसीतैशी : उपनिबंधक कार्यालयाचे संशयास्पद धोरण
देवळी : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या धोरणात्मक कार्यक्रमाला खाजगी सावकराकडून मुठमाती दिली जात आहे. शेतकऱ्यांकडे सोने गहाणातून थकलेल्या पैश्यांचा शासनाने व्याजासहीत भरणाकडून सुद्धा संबंधितांकडून अतिरिक्त व्याज घेवून लुबाडले जात आहे. शासन निर्णयाची कोणतीही भीती न बाळगता खाजगी सावकारांचा हा गोरखधंदा अजूनही सुरूच आहे. या सर्व प्रकाराकडे तालुका उपनिबंधक कार्यालय डोळे उघडे ठेवून पाहत आहे. तालुक्यातील एका कास्तकाराने या संबंधीची लेखी तक्रार उपनिबंधकाकडे दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सावकाराच्या तावडीतून सुटण्यासाठी शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील कास्तकारांसाठी १७१ कोटीचे पॅकेज जाहीर केले. यानुसार माहे १ एप्रील ते ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंतची सावकारी प्रकरणे पात्र ठरविण्याचे निकष ठेवण्यात आले. यासाठी तालुकास्तरीय तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली. यात तहसीलदार, तालुका उपनिबंधक व लेखा परीक्षक यांचा समावेश होता. तालुका उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने परवानाधारक सावकारांकडून सोने गहाणपत्राची माहिती मागवून घेण्यात आली.
धोरणात्मक निर्णयानुसार देवळी तालुक्यातून ५५० सावकारी कर्जाची प्रकरणे विचाराधीन घेण्यात आली. यापैकी १९९ प्रकरणांना मंजुरी देवून याबाबतची २५ लाखांची राशी सावकारांच्या खात्यात वळती करण्यात आली. यामध्ये सावकार गिरीश राठी यांच्याा खात्यात १६ लाख व काँकरिया यांच्या खात्यात ८ लाख २० हजार रुपये जमा करण्यात आले. उर्वरित ३५० प्रकरणे आॅडीटरकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत.
सावकारी कर्जाचा व्याजासहीत भरणा शासनाच्यावतीने करण्यात आल्यामुळे संबंधित कास्तकारांना फक्त गहाण असलेले सोने घेण्यासाठी सावकराकडे जायचे होते. परंतु प्रत्यक्षात शासनाच्या नियमांना तिलांजली देत व्यतिरिक्त शेकडा दोन टक्के याप्रमाणे व्याजाची अतिरिक्त पैसे घेण्यात आले. तालुक्यातील एका कास्तकाराने राठी यांच्याकडून माहे मे मध्ये ५ हजार, जून मध्ये ८ हजार व १४ हजार तसेच आॅगस्टमध्ये १० हजाराची उचल केली. सावकारी कर्जात या कास्तकाराचे नाव असल्यामुळे शासनाने त्यांच्या कर्जाची मुद्दल ३७ हजार व व्याजाचे ३ हजार ३०५ रुपये असे एकूण ४० हजार ३०५ रुपये सावकाराचे खात्यात चुकते केले.
हा कास्तकार आपले सोने घेण्यासाठी संबंधित सावकाराकडे गेला असता त्याचेकडून पुन्हा व्याजाचे अतिरिक्त ७,७५० रुपये वसूल केले. अशाच प्रकारे तालुक्यातील बहुतेक कास्तकारांना लुबाडण्यात आले. एकीकडे शासन आत्महत्याग्रस्त भागासाठी धोरणात्मक कार्यक्रम राबवित आहे. दुसरीकडे शेकडा चार टक्क्याच्या व्याजासाठी हपापलेल्या सावकारांनी त्याच शासनाची व समाजव्यवस्थेची वाट लावल्याचे दिसते.(प्रतिनिधी)