सोने गहाण करताच केली जाते कर्ज कपात
By admin | Published: August 18, 2016 12:40 AM2016-08-18T00:40:25+5:302016-08-18T00:40:25+5:30
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पीककर्ज घेतले. पेरण्या उरकल्या. काही प्रमाणात निंदण, डवरणाची कामेही झाली;
बँकांचा प्रताप : शेतीच्या कामांमध्ये येतोय व्यत्यय
सेलू : शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पीककर्ज घेतले. पेरण्या उरकल्या. काही प्रमाणात निंदण, डवरणाची कामेही झाली; पण आता खत देणे, फवारणी करणे यासह पुन्हा निंदणाची कामे करावी लागणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्याने शेतकरी सोने तारण करून कर्ज घेण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण बँकेत सोने तारण करताच मिळणाऱ्या रकमेतून पीक कर्जाची कपात केली जात असल्याचे प्रकार उघड होत आहे. या प्रकारामुळे शेतकरी मात्र हतबल झाला असून शासनाचे शेतकरी हिताचे धोरण कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यामुळेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. कर्जाची रक्कम इतर रकमेतून कपात केली जाणार नसल्याचे शासनाने जाहीर केले. असे असले तरी कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेती गहाण करावी लागते. यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने शेतकऱ्यांनी जवळ असलेले सोने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेण्याचा पर्याय निवडला; पण हा मार्गही शेतकऱ्यांकरिता जटीलच ठरत आहे.
बँक आॅफ इंडियाच्या सेलू शाखेमध्ये शेतकरी सुवर्ण तारण योजनेंतर्गत कर्ज घेण्याकरिता जात आहेत. बँकेतून सोने गहाण ठेवून मिळणारी रक्कम पूर्ण न देता शेतकऱ्यांवर असलेल्या कर्जात वळते करण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. शेतीला निंदण, डवरणी, खत व फवारणी देण्याची वेळ असताना अशी कर्जकपात होत असल्याने शेतकरी हताश झाला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा सावकाराच्या दारात लोटण्याचा प्रकार सुरू आहे. आता शेती कशी करायची, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. काही शेतकरी डोळ्यात अश्रू घेऊन बँकेतून रिकाम्या हाताने परतत असल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांनी बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. मग, शेतकऱ्यांनी जाब कुणाला विचारायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने बँकेतील या प्रकारांकडे लक्ष देत कार्यवाही करावी, सुवर्ण तारण योजनेत कर्जकपात करण्यात येऊ नये, अशा सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.(शहर प्रतिनिधी)
शेतकरी हिताच्या धोरणांचा अभाव
शेतकरी हिताची धोरणे राबविली जातील, असे भाजपाकडून सांगण्यात येत होते; पण अद्यापही शेतकरी हिताची धोरणे राबविली जात नसल्याचेच दिसून येत आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही बँकांकडून त्रास दिला जात असल्याने असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांना सुवर्ण तारण योजनेंतर्गत सोने गहाण ठेवून कर्ज दिले जात आहे. यात शेतकऱ्यांकडे जुने कर्ज असल्यास ते आपोआप कपात होत आहे. ही कपात अधिक होत नसून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे. बँकेच्या सॉफ्टवेअरमुळेच हा प्रकार होत आहे.
- दीपक पिंपरीकर, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, सेलू.