वन्य प्राण्यांनी केले कपाशीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:40 PM2018-11-13T23:40:29+5:302018-11-13T23:41:35+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमिवर रानडुक्कराच्या कळपाने खरांगणा (मो.) नजीकच्या दहेगाव (गोंडी) शिवारात पाच एकरातील कपाशी पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.
आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) येथील शेतकरी कीर्तीपाल, पुरुषोत्तम आणि दादारावजी चाफले यांच्या नावे खरांगणा (मोरांगणा) आणि दहेगाव (गोंडी) शिवारात शेती आहे. शेती हेच त्यांच्या उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. त्या शेतीत चाफले यांनी कपाशीची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परिणामी, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भरघोस उत्पन्न होईल अशी आशा असताना चाफले यांच्या शेतात रानडुकराच्या कळपाने घुसून उभ्या कपाशी पिकाची नासडी केली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
आधीच शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. कधी शेतात पाणी साचून तर कधी पाण्याने दडी मारल्याने नुकसान होते. या भागातही नित्याचाच असा प्रकार घडतो. रानडुकरांचा या भागात सातत्याने धुमाकुळ आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात असलेल्या वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.