कोरडवाहू कापूस उत्पादकांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:25 AM2018-11-28T00:25:11+5:302018-11-28T00:25:29+5:30

यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे.

Loss of dryland cotton growers | कोरडवाहू कापूस उत्पादकांचा तोटा

कोरडवाहू कापूस उत्पादकांचा तोटा

Next
ठळक मुद्देओलिताखाली कापसाचे उत्पन्न दीडपट : लहान व्यापाऱ्यांचे ‘अच्छे दिन’, शासनाचे खरेदी केंद्र बंदच

अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी कपाशीच्या उत्पादनात निसर्गाच्या अस्मानी संकटाने कहर केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा तोटा झाला आहे. ओलिताखालील कापूस उत्पादन दीडपट वाढले आहे. मात्र खेडा पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगलच लुटण्याचे सत्र ग्रामीण भागात सुरू आहे. शासनाच्या हमीभावाची खरेदी अद्यापही सुरू झालीच नसल्याने शासकीय धोरणाचा फज्जा उडाल्याचे वास्तव्य आहे. आष्टी तालुकाच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात कुठेही हमीभावाची खरेदी सुरू झाली नाही.
पावसाळा संपल्यावर सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने पीक उत्पादनावर परिणाम होण्याचे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. कपाशीवर दह्या, कवडी, मुळकुज, करपा, बोंडावरील काळे ठिपके, पानावरील काळे ठिपके या रोगांनी विविध भागात आक्रमण केल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा जास्त खर्च करावा लागला सुरूवातीला पाना फुलावर पीक आले तेव्हा उत्तम स्थिती दिसत होती. मात्र बोंडाची भरणा झाली तेव्हा पहिल्या वेच्यामध्ये अवघ्या १५ ते १७ टक्केच बोंडाची फुटून झाल्याने शितादहीचा कापूस अत्यंत कमी उत्पादन झाला.
आष्टी तालुक्यात थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, किन्ही, मोई, पोरगव्हाण, पंचाळा, पांढुर्णा या मौजातील कापूस अवघ्या दोनच वेचणीत उलंगवाडी झाला आहे. सरासरी प्रत्येक शेतकºयाला एकरी ३ ते ५ क्विंटल उत्पन्न झाले आहे. खासगी व्यापारी वर्गाने दिवाळीच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू केली तेव्हा भाव ५ हजार ९७१ प्रति क्विंटल दिला होता. नंतर कापसाचे ग्रेडेशन पाडून ६ हजार ६५० पर्यंत भाव दिला आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च देखील वसूल झाला नाही. शेताची नांगरणी, डवरणी, पेरणी, फवारणी, कपाशी वेचणी पर्यंतचा सरासरी एकरी खर्च २५ ते ३० हजाराच्या घरात आहे. निंदनासाठी सर्वाधिक खर्च करावा लागतो. अशावेळी निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकºयाला पार उध्वस्त केले आहे. त्यामुळे सोयाबीनमुळे बुडालेल्या शेतकरी कपाशीच्या उत्पादनाने आणखीनच चिंताग्रस्त झाला आहे.
मागील वर्षी कापसाची वेचणी प्रती मन १५० ते २०० रुपये होती. यावर्षी १०० ते १२० रुपये प्रतिमन एवढा भाव आला आहे. किडीमुळे कापूस काहीसा चिकट आल्याने वेचणीला थोडा वेळ लागत आहे. याउलट ओलित भागातील कपाशीला चांगला काळ असल्याचे चित्र आहे. ओलित कपाशीचा कापूस एकरी १२ ते १५ क्विंटल कापूस होणार असल्याची माहिती आहे. शेतकरी मात्र भावामध्ये पुरता हादरला असल्याने पीक हाती येण्या आधीच ग्रहण लागल्याची स्थिती आहे.
आष्टी तालुक्यात सध्या दोन जिनिंग सुरू झाले आहे. एम.आर.जिनिंग प्रेसिंगचे संचालक दिलीप राठी यांनी सांगितले की, यावर्षी कापूस कोरडवाहू शेतामध्ये पाहिजे तसा उत्पादन झाला नाही. कापूस आवक कमी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कापसाला ५ हजार ९०० पासून भाव दिला आहे.कापूस उत्पादनाचा फटका शेतकऱ्यांसोबत, जिनिंग प्रेसिंगला बसला आहे. कापसाची आवक मंदावल्याने मजूरीचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण अर्थकारण संपुष्टात आले आहे.
शासनाच्या हमीभावाची खरेदी कधी होणार?
राज्य तथा केंद्र शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे वचनबद्ध केले. त्याची घोषणा केली. मात्र हमीभावाची खरेदी अद्याप सुरू झाली नसल्याने शासन नावाची यंत्रणा किती दक्षता पाळते. याचाही अनुभव चांगलाच झाला आहे. कापूस पणन महासंघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मार्फत असणारे हमीभावाचे केंद्र म्हणजे बोलाच भात अन बोलालीच कढी असल्याच्या प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केल्या आहे.
खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचं चांगभलं
कापूस उत्पादन सुरू झाल्याबरोबर गावखेड्यातील लहान व्यापारी शेतकºयांकडे अक्षरश: तुटून पडले. ओळखीचा फायदा तर कुठे व्याजाने आणलेले पैसे परत मिळण्यासाठी ही गर्दी होती. त्यामुळे वजनाच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या शेतकरी वर्गाला कापूस देणे बंधनकारक होते. काही ठिकाणी व्यापारी वर्गाने काटा करताना मोठी दांडी मारली. त्यानंतर कापूस गोळा केल्यावर मोठ्या ठिकाणी विकताना लहान व्यापाºयांनी पाणी मारून वजन वाढविले. यात स्वहित जोपासण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. एकूणच ग्रामीण भागात खेडा पद्धतीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.

Web Title: Loss of dryland cotton growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस