शेतकरी आरक्षणाच्या आॅनलाईन नोंदणीला देशभरातून उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:06 PM2018-03-26T12:06:13+5:302018-03-26T12:37:00+5:30
एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीला लोकाभिमूख करण्याच्या उद्देशाने मिशनच्यावतीने शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीला लोकाभिमूख करण्याच्या उद्देशाने मिशनच्यावतीने शेतकऱ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ (वेबसाईट ) सुरू करण्यात आले आहे. या नोंदणीला देशाच्या व देशाबाहेरूनही शेकडो तरुण व शेतकऱ्यांनी भेट देत आपल्या नावाची नोंद करीत शेतकरी आरक्षण मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. एकाच दिवशी २६ हजार जणांची नोंदणी झाली आहे.
हिंदी व मराठी भाषेतूनही नोंदणी करण्याची सोय एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या वेबसाईटवर करण्यात आली आहे. शेतकरी आरक्षण वा किसान आरक्षण, या नावाने ही व्यवस्था करण्यात आली असून लवकरच या चळवळीला लोकाभिमूख करण्याचा मानस या आरक्षणाचे पुरस्कर्ते शैलेश अग्रवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्रसह देशात शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. आतापर्यंत देशभरात ५० हजारांवर अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक, सामाजिकदृष्ट्या बळकट करण्याच्या उद्देशाने ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ ही चळवळ सेवाग्राम येथील बापूकुटी परिसरातून एक वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. अनेक ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतकरी आरक्षणाचे ठराव पारित केले. त्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्ट्रय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पुणे येथे एका कार्यक्रमात शेतकरी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना आरक्षण देण्याबाबत जाहीर भूमिका मांडली. त्यामुळे या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय शैलेश अग्रवाल यांनी घेतला. गुढीपाडव्यापासून हिंदी व मराठी भाषेत जनपाठिंब्यासाठी नोंदणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात शेतकऱ्याचे नाव, त्याचा मोबाईल क्रमांक, त्याचे गाव, त्याचा जिल्हा आदी बाबींची नोंद घेण्यात येत आहे. या सर्व बाबी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांचे मतही यावर मागविले जात आहे. एकाच दिवसात २६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध भागातून आपल्या नावाची नोंदणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यात शेतकरी आरक्षणाचे समर्थक आहेत काय? व शेतकरी आरक्षणाचे विरोधक यांचीही बाजू मांडण्याची सोय करण्यात आली. ‘डब्ल्युडब्ल्युडब्ल्यु.किसान आरक्षण. कॉम’ या संकेतस्थळावर नोंदणीची सोय उपलब्ध आहे.