प्रेमाच्या जांगडबुत्त्याने केल्या रसिकांना गुदगुल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:21 PM2018-02-01T23:21:22+5:302018-02-01T23:21:35+5:30
प्रेमाचा जांगडबुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं...या नारायण पूरी यांच्या प्रेमावरील हास्य कवितेने रसिकांना गुदगुल्या केल्या. निमित्त होते, एक रात्र कवितेची, या मैफलीचे!
ऑनलाईन लोकमत
हिंगणघाट : प्रेमाचा जांगडबुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता गं, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा गं...या नारायण पूरी यांच्या प्रेमावरील हास्य कवितेने रसिकांना गुदगुल्या केल्या. निमित्त होते, एक रात्र कवितेची, या मैफलीचे!
लोकसाहित्य परिषदेद्वारे ‘एक रात्र कवितेची’ या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी कवींनी एका पेक्षा एक सरस रचना सादर करून रसिकांना खिळवून ठेवले.
गेले जमाने आंबे चिंचाचे, बोरीच्या खाली बोरं येचाचे, हरपला ठेचा हरपला कयना, गावात आता लाजेना मैना या ओळी सादर करून नितीन देशमुख यांनी काव्य रसिकांनी खचाखच भरलेल्या हरिओम सभागृह टाळ्यांच्या गजरात हरवून सोडले.
उदघाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वºहाडी कवी शंकर बडे यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. उषा थुटे तर अतिथी म्हणून आ. समीर कुणावार, कृउबास सभापती अॅड. सुधीर कोठारी, माजी न.प. अध्यक्ष पंढरी कापसे, माजी आमदार राजू तिमांडे, परिषदेचे अध्यक्ष राजू चाफले, प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, कृष्णाजी व्यापारी, किशोर दिघे आदी उपस्थित होते. काव्य मैफलीत प्रसिद्ध कवी नारायण पुरी तुळजापूर, गजलकार नितीन देशमुख अमरावती, वºहाडी किस्सेकार गौतम गुडधे परतवाडा, अलका तालनकर परतवाडा आणि प्रा. कलीम खान यवतमाळ हे कवी सहभागी झाले होते. प्रारंभी प्रतिष्ठेचा विदर्भ लोकरत्न सन्मान फासेपारधी समाजातील मुलांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे मंगरूळ चव्हाळा येथील मतीन भोसले यांना लोकसाहित्य परिषदेद्वारे प्रदान करण्यात आला. भोसले यांनी प्रश्नचिन्ह प्रकल्प उभारताना मिळालेली प्रेरणा व संकटांचा सामना कसा केला, याचे अनुभव कथन केले. यावेळी सामाजिक क्षेत्रात कार्यरत गजू कुबडे, गांधी वाचनालयाचे ग्रंथपाल नारायण झोडे यांचा सत्कार आ. कुणावार यांच्या हस्ते करण्यात आला
देशमुख यांच्या खुमासदार निवेदनाने मैफलीस प्रारंभ झाला. त्यांनी सामाजिक आशय असणाºया गजल सादर केल्या. पापण्यांतून जेवढी बरसात होते, मोकळी दु:खास जागा आत होते आणि केवळ दाखल्यावर नोंदल्याने एवढी मजबूत साली जात होते, एवढ्या वर्षात औषध ना मिळाले, संसदेला कोणता आजार आहे, मी विनोदानेच म्हटले प्रेम करूया, ती म्हणाली आज ताट रविवार आहे, अशा विनोदी रचना त्यांनी सादर केल्या. कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वत:च अपुली राख उधळीत जाणे, या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा, गौतम गुडधे यांनी विनोदी कविता व किस्से सादर केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर चौधरी, मानपत्र वाचन लीना शेंडे, संचालन प्रा अभिजित डाखोरे यांनी केले.