प्रियकरानेच काढला ‘संध्या’चा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:22 PM2018-05-03T23:22:35+5:302018-05-03T23:22:35+5:30
पिपरी (मेघे) भागातील पिपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात बुधवारी संध्या महादेव पाटील (तेलंग) रा. गजानननगर हिचा मृतदेह आढळून आला होता. संध्याची गाळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पुढे येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पिपरी (मेघे) भागातील पिपल्स फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रमाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात बुधवारी संध्या महादेव पाटील (तेलंग) रा. गजानननगर हिचा मृतदेह आढळून आला होता. संध्याची गाळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पुढे येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. यात अवघ्या १२ तासातच पोलिसांनी संध्याचा मारेकरी शोधून त्याला अटक केली. गिरीष वसंत बिडवाईक (४८) रा. लहरीनगर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संध्या आणि गिरीष यांच्यातील अनैतिक संबंधातून तिच्या हत्येची कबुली आरोपीने दिली.
रामनगर येथील संजय तेलंग याच्याशी संध्या पाटील हिचा सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. परंतु, पती संजयला असलेल्या दारूचे व्यसन व त्यापासून होणारा त्रास याला कंटाळून संध्या लग्नाच्या काही वर्षानंतर वेगळी राहायला लागली. २० वर्षांपासून ती माहेरी राहत होती. याच कालावधीत संध्याने पोस्ट विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आरडीचे अधिकृत अभिकतृत्त्व स्विकारले. याच कालावधीत शहरातील मानसमंदिर भागातील पोस्ट आॅफिस येथे पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या गिरीष बिडवाईक याच्याशी तिचे सूत जुळले. सुमारे सात वर्षापूर्वीपासूनच्या संध्या व गिरीष यांच्यातील प्रेमसंबंधात गिरीषची नाशिक येथे बदली झाल्याने थोडा दुरावा निर्माण झाला.
याच दुराव्यामुळे काही दिवसांपासून संध्या गिरीष याला वेठीस धरत होती. तिच्या या जाचाला कंटाळून अखेर संध्याला जीवानीशी ठार करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.
घटनेच्या दिवशी गेले होते फिरायला
नाशिक येथे गिरीषची बदली झाल्याने तेथे मलाही घेऊन चाल अशी गळ मृतक संध्याकडून लावली जात होती. याच कारणामुळे सुमारे सात वर्षांपासून संध्या व गिरीष यांच्यातील अनैतिक संबंधात काहीसा दुरावा आला होता. घटनेच्या दिवशी मृतक संध्या व गिरीष हे दोघेही सुकळी येथे फिरायला गेले होते. दरम्यान दोघांचा वाद झाला. याच वादादरम्यान गिरीषने संध्याचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संध्याचा मोबाईल आणि वाहन ठरते महत्त्वाचे
पोलीस तपास सुरू असताना मृतक संध्याचा मोबाईल आणि तिचे वाहन तपासाकरिता महत्त्वाचे ठरले. या दोन्ही बाबींच्या माध्यमातूनच आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले.
घटनास्थळीच मारले
संध्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी तो आणून टाकला अथवा तिची तिथेच हत्या करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला असता तीची घटनास्थळीच हत्या केल्याचे समोर आले आहे.
आरोपीला ५ मे पर्यंत पीसीआर
गिरष बिडवाईक याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला पुढील तपासाकरिता न्यायालयाने ५ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
पुरावे नष्ट करण्याचा झाला प्रयत्न
गिरीष बिडवाईक याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संध्याचा काटा काढल्यानंतर गिरीषने संध्याचा मोबाईल पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने इतर ठिकाणी फेकुन दिल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.