कीडक कापसाच्या नावाखाली कमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 11:31 PM2018-01-31T23:31:39+5:302018-01-31T23:32:21+5:30
बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत पंचनाम्यात अडकली असल्याचे वास्तव आहे. कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी कापसाचे बोंड पूर्णत: सडले. त्यातून कापूस निघालाच नाही. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कपाशी उपडून फेकली. यावर्षी कपाशीचे उत्पादन घटले. एकरी उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबरच्या सुरूवातीला कापसाचा भाव ५५०० ते ५६०० रूपये क्विंटल पर्यंत वाढला. जानेवारीच्या महिन्यात चांगल्या कापसाला ५००० ते ५१०० रूपये भाव होता. किडक कापूस ३५०० ते ४००० रूपये दराने व्यापारी खरेदी करीत असल्याने लागवडीचा खर्च निघण्याची आशा मावळली.
लागवडीचा खर्च निघण्याची आशा धूसर
शेतकरी दुष्काळाने पिडलेला असताना नगदी पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. हेक्टरी ३० हजार रूपये मदत देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. कापसाच्या पिकाला अनुदान जाहीर करावे ही अपेक्षा होती. शासनाने ते कामही सर्वेक्षणाच्या माध्यमातून चालू केले. यात अगोदर विविध अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. अर्ज भरण्याची अट घातली. यात शेतकऱ्यांची धावपळ झाली व पैसेही खर्च झाले. यावर्षी शेतकऱ्यांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय वेचणी मजुरांमार्फत करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे दिडशे रूपये अतिरिक्त मोजावे लागले होते. सध्या किडक कापसाला चार हजार भाव दिला जातो तर चांगल्या कापसाला ५ हजार भाव मिळत असल्याने शेतकरी व्यथीत झाला आहे.