साहेब! धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 11:45 AM2021-09-20T11:45:12+5:302021-09-20T15:39:58+5:30
मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे.
वर्धा : सिंदी (रेल्वे) शहरातील स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याने लाभार्त्यांनी असंतोष व्यक्त केला आहे. अनेक लाभार्थ्यांकडून साहेब धान्य देत आहात तर खाण्यायोग्य द्या, अशी ओरड होत आहे. याबाबत नागरिकांनी प्रभारी तहसीलदार नितीन गौर यांच्याकडे निवेदन देऊन चांगल्या धान्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
शहरात धान्य पुरवठा विभागाच्या गोदामातून सेलू तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. गोदामातील धान्य पूर्णपणे सुरक्षित असतो, तरीदेखील मागील काही महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून एपीएल, बीपीएल आणि सामान्य केशरी कार्डधारकांना वाटप करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असून साधे खाण्यायोग्यही नसल्याची ओरड होत आहे. गोदामात साठवणूक केलेले धान्य निकृष्ट कसे होते, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याची दखल घेत शहरातील काही नागरिकांनी प्रभारी तहसीलदार नितीन गौर यांची भेट घेत, गोरगरिबांना मिळणारा निकृष्ट धान्य पुरवठा तत्काळ थांबवा, या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली.
निवेदन देताना सिंदी शहर मित्र परिवार ग्रुपचे तानाजी झाडे, बाबा भुते, गजानन खंडाळे, रवी वाघमारे, अजय कलोडे, रवी राणा, आफताब क्युरेशी, दत्ता कटाईत यांची उपस्थिती होती.