'लम्पी' ठरतोय 'प्राणघातक'; पाच महिन्यांत २२ जनावरांचा मृत्यू
By महेश सायखेडे | Published: August 29, 2023 03:44 PM2023-08-29T15:44:06+5:302023-08-29T15:45:20+5:30
पशुपालकाने दक्ष राहत खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकाेरपणे पालन करण्याची गरज
वर्धा : जिल्ह्यात जनावरांवरील लम्पी चर्मरोगाची तिसरी लाट लक्षात घेऊन संबंधित आजारावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सूक्ष्म नियोजन केल्याचे सांगण्यात येते. इतकेच नव्हे तर उद्दिष्टाच्या तुलनेत ९८ टक्के जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. शिवाय ५० टक्क्यांहून अधिक गोठ्यांमध्ये औषध फवारणीचे काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी गो-वंश जनावरांसाठी लम्पी चर्मरोग सध्या प्राणघातक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
मागील पाच महिन्यांत वर्धा जिल्ह्यात लम्पी या रोगाने तब्बल २२ जनावरांचा बळी घेतला आहे. तर सध्या ५७ जनावरे लम्पी चर्मरोगासोबत लढा देत आहेत. एकूणच लम्पी चर्मरोगाचा मृत्यू दर लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक पशुपालकाने दक्ष राहत खबरदारीच्या उपाययोजनांचे काटेकाेरपणे पालन करण्याची गरज आहे.
घटसर्प अन् एक टांग्याचे रुग्ण नाहीतच
पावसाळ्याच्या दिवसांत घटसर्प आणि एक टांग्या या जनावरांनी आजारांचा झपाट्याने प्रसार होतो; पण यंदाच्या वर्षी आतापर्यंत घटसर्प आणि एक टांग्यांची एकाही जनावराला लागण झाली नसल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
** 'व्हॅक्सिनेशन' ९८ टक्के **
लसीकरणाचे उद्दिष्ट : २,७५,८८०
प्राप्त लस : २,७५,९००
प्रत्यक्षात झालेले लसीकरण : २,७२,३३९
पाच महिन्यांत २७९ जनावरांना लागण
मागील पाच महिन्यांत २७९ जनावरांना लम्पी चर्मरोगाची लागण झाली आहे. त्याबाबतची नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. २७९ पैकी २०१ जनावरे लम्पीमुक्त झाली असून २२ जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. तर ५६ लम्पी बाधित जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत.