जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर पोहोचला 2.40 टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:35 PM2022-10-11T22:35:09+5:302022-10-11T22:35:46+5:30
आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोवंशाचा लम्पी चर्मरोगामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी लम्पी निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात सन २०२० मध्ये एन्ट्री करून तब्बल १६ हजार ९०० जनावरांना मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहणारा लम्पी चर्मरोग हा सध्या आपला आवाका वाढवू पाहत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत लम्पी चर्मरोगाची लागण झालेली तब्बल ८३ जनावरे आढळली असून, त्यापैकी दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर १७ जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. एकूणच जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा मृत्युदर २.४० टक्के असून, तशी नोंदही पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात लम्पीची लागण झालेली एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी ज्या तालुक्यात लम्पीची लागण झालेली जनावरे सापडली त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांचा समावेश आहे, तर आर्वी तालुक्यात एका तर आष्टी तालुक्यात एका गोवंशाचा लम्पी चर्मरोगामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी लम्पी निर्मूलनासाठी जिल्हा प्रशासनातील पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.
प्राप्त झाले प्रतिबंधात्मक लसीचे १.८५ लाख डोस
- लम्पी चर्मरोगाच्या प्रसाराला वेळीच ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहेत. इतकेच नव्हे, तर पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर विशेष प्रयत्नही करीत आहे. पशुसंवर्धनच्या प्रयत्नांना बळ देण्यासह लम्पी निर्मूलनासाठी लम्पी प्रतिबंधात्मक लसीचे १ लाख ८५ हजार डोस आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्त पशुपालकांना दिली आर्थिक मदत
- लम्पी चर्मरोगामुळे जनावर दगावलेल्या दोन्ही पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शासकीय नियमानुसार आर्थिक मदत देण्यात आली आहे, तर उपचाराखाली असलेल्या प्रत्येक लम्पीबाधित जनावरावर पशुसंवर्धन विभागाचा वॉच आहे.
१.७२ लाख जनावरांना दिली प्रतिबंधात्मक लस
- लम्पी चर्मरोगाला ब्रेक लावण्यासाठी गोट पॉक्स ही लस उपयुक्तच आहे. ज्या भागात लम्पी बाधित जनावर सापडले त्या भागातील जनावरांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आतापर्यंत १ लाख ७२ हजार ३५४ गोवंशांना गोट पॉक्स ही लस देण्यात आली आहे. तशी नोंद पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात लम्पीबाधित एकूण ८३ जनावरे सापडली आहेत. त्यापैकी दोन जनावरांचा मृत्यू झाला, तर १७ जनावरे लम्पीमुक्त झाली असून, ६४ जनावरांवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत १ लाख ७२ हजार ३५४ गोवंशांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.
- डॉ. राजेश वासनिक, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद.
वर्धा.