वर्ध्यातही लम्पीचा शिरकाव; सात जनावरांमध्ये आढळली लक्षणे
By आनंद इंगोले | Published: September 21, 2022 03:16 PM2022-09-21T15:16:09+5:302022-09-21T15:20:38+5:30
४ गावे बाधित तर २४ गावे सतर्कता क्षेत्र; प्रतिबंधीत उपायोजनांना सुरुवात
वर्धा : राज्याभरात लम्पी चर्म रोगाने चांगलाच हाहाकार माजविला असून वर्धा जिल्हा यापासून लांब होता. पण, नुकताच जिल्ह्यातील आर्वी आणि आष्टी तालुक्यातील चार गावांमध्ये लम्पी आजाराचे लक्षणे असलेली सात जनावरे आढळून आल्याने प्रशासकीय यंत्रणा अॅक्शनमोडवर कामाला लागली.
राज्यातील प्रमुख शहरांपाठोपाठ आता वर्धा जिल्ह्यातही गोवंशीय पशुधनात लम्पी चर्म रोगाचा शिरकाव झाला आहे. आर्वी तालुक्यातील हिवरातांडा, आर्वी शहर व सावळापूर, आष्टी तालुक्यातील वडाळा या चार गावांमधील सात जनावरांना लम्पीचे लक्षणे दिसून आली. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या चार गावांना बाधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. त्यासोबतच बाधित गावांपासून ५ किलो मीटर अंतरापर्यंतच्या परिसरातील २४ गावांना सतर्कता क्षेत्र जाहीर केले आहे. यामध्ये हिवरातांडा परिसरातील हर्रासी, पाचोड, बेल्हारातांडा, हिवरा, जामखुटा, राजणी. आर्वी परिसरातील खडकी, शिरपूर, पिपळा (पु.), वाढोणा (पु.), मांडला, धनोडी (नां.). सावळापूर परिसरातील अंतरडोह, जाम (पु.), जाम, लहादेवी, पांजरा, हरदोली, बाजारवाडा आणि वडाळा परिसरातील बोरगाव, टुमणी, झाडगाव, वर्धपूर, सत्तरपूर या गावांचा समावेश आहे. बाधित क्षेत्र आणि सतर्कता क्षेत्रातील गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या जनावरांना चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत संबंधित नगरपंचायत व ग्रामपंचायतींना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्याचे शव, कातडी यास इतरत्र प्रवेश आणि वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.
प्रशासन ऑन दी स्पॉट
आर्वी आणि आष्टी तालुक्यातील जनावरामध्ये लम्पी चर्म रोगाची लक्षणे आढळून आल्याने प्रशासने कामाला लागले आहे. लागलीच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी बाधित क्षेत्राला भेटी देवून जनावरांची पाहणी करीत शेतकºयांसह पशुपालकांशी संवाद साधला. यावेळी उपविभगीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वासनिक, डॉ. वंजारी यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.