शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन १६ लाखांनी केली फसवणूक

By रवींद्र चांदेकर | Published: July 1, 2024 05:11 PM2024-07-01T17:11:02+5:302024-07-01T17:12:06+5:30

गुन्हा दाखल : मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर

Lured by online savings, 16 lakhs fraud | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन १६ लाखांनी केली फसवणूक

Lured by online savings, 16 lakhs fraud

वर्धा : एका अज्ञाताने वर्धा येथील एकाला मोबाइलवरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची ऑफर देऊन जादा रक्कम मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, १६ लाख २० हजार रुपये गुंतविल्यानंतर अज्ञाताने फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या ३० मार्च २०२४ रोजी एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटमध्ये बचतीच्या संबंधाने तक्रारकर्त्याला प्रमोशनल मेसेज आला. त्यावर रिप्लाय केला असता त्यांना ३१० जणांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपला जोडण्यात आले. त्या ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत प्रेरित करण्यात आले. वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगून ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतविण्यात येत असल्याबाबत एका संकेतस्थळाद्वारे दाखविण्यात येत होते. त्या पोर्टलमध्ये तक्रारकर्त्याने १७ एप्रिल रोजी प्रथम ५० हजारांची गुंतवणूक केली. त्या रकमेमध्ये मोठी वाढही झाली होती. त्यामुळे तक्रारकर्त्याने १८ जूनपर्यंत वेळाेवेळी १६ लाख २० हजार ३०१ रुपये आरोपीने व्हॉट्सॲपवर दिलेल्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरले.

रक्कम जमा झाल्यानंतर तक्रारकर्त्याने ती नंतर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विड्रॉल होत नव्हता. अखेरीस आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी २४ जून रोजी नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. ही तक्रार आता वर्धा येथील सायबर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्हॉट्सॲप, टेलिग्रामच्या माध्यमातून ग्रुपद्वारे, खासगी मॅसेजवर नागरिकांशी संपर्क करतात. त्या ग्रुपमधील आरोपींचेच लोक त्यांना शेअर मार्केट गुंतवणूकीतून खूप फायदा मिळत असल्याचे दाखवून नागरिकांना प्रलोभित करतात. आरोपी नागरिकांना प्रथम फ्री डेमो देतात. नंतर छोटी गुंतवणूक करण्यास सांगून काही मोबदला देतात. त्यांची कपंनी सेबी रजिस्टर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून नागरिकांचा विश्वास संपादन करतात.

अशा प्रकारच्या वेबसाइट खऱ्या शेअर मार्केटच्या डाटासोबत लिंक असलेले पोर्टल त्यांना वापरण्यासाठी देतात. आरोपी नागरिकांकडून प्राप्त रक्कम स्वतः वापरतात किंवा त्यांच्या डीमॅट अकाउंटमधून शेअर मार्केटमध्ये गुंतवितात. त्यामुळे नागरिकाना कोणताही मोबदला मिळत नाही. नागरिक पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आरोपी त्यांची रक्कम अडवून ठेवतात. अशा गुन्ह्यामधील मोबाइल नंबर व बँक अकाउंट हे गैरमार्गाने संपादित केलेले असतात. त्यांचा ते मोठ्या प्रमाणात गैरवापर करतात.

जिल्ह्यात आतापर्यंत घडली नऊ प्रकरणे
वर्धा जिल्ह्यात अशी नऊ प्रकरणे आतापर्यंत उघडकीस आली. सायबर पोलिस ठाण्यात ऑनलाइन इन्व्हेस्टमेंटचे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यात नागरिकांची एक लाख ते १६ लाखांपर्यंत फसवणूक झाली आहे. नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल १९३० वर अनेक तक्रारी चौकशीत आहेत. नागरिकांनी शेअर मार्केट गुंतवणूक ही डी-मॅट अकाउंटवरून योग्य कंपन्यांकडूनच करावी. व्हॉट्सॲप, टेलिग्रामवर येणाऱ्या अनोळखी इसमांच्या भूलथापांना बळी पडू नये. आपली रक्कम कोणत्याही कंपनी, इंटरप्रायजेसच्या अकाउंटवर टाकू नये. अनोळखी व्यक्तींना थोड्या जास्त नफ्याच्या लोभापायी आपली बँकेची अथवा आधार, पॅनकार्डची माहिती शेअर करू नये. असे गैरप्रकार निदर्शनास आल्यास जवळील सायबर सेलला तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Lured by online savings, 16 lakhs fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.