म. गांधी १५० वे जयंती वर्ष; ९४ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यात रोवली ग्रामोद्योगाची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 04:09 PM2019-10-01T16:09:48+5:302019-10-01T16:13:40+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली.
उदय गडकरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव मोठ्या उत्साहात व प्रसन्न मनाने सहभागी झाले होते. नुतन राष्ट्रीय विद्यालयात त्यांचे प्रथम स्वागत
झाले. त्यानंतर पदयात्रा खादी ग्रामोद्योग कार्यालयाकडे आगेकुच झाली. गांधीजींनी परिसराची पाहणी करून थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर एक सभा झाली. खादी कार्यालयाचे तत्कालीन व्यवस्थापक एन. के. देशपांडे यांनी हस्तलिखीत मानपत्र देऊन गांधीजींचा सत्कार केला. मानपत्रासोबत राष्ट्रीय कार्यासाठी ६१ रूपयांची थैली सन्मानाने प्रदान केली. त्यानंतर १९३६ रोजी गांधीजी पुन्हा सावली गावाला भेट दिली. त्यावळी त्यांनी एक आवठडा मुक्काम केला होता. अ. भा. गांधी सेवा संघाची सभा झाली होती. त्यामध्ये गांधीजींसोबत आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद सहभागी झाले होते. २७ फेबु्रवारी ते ३ मार्च १९३६ पर्यंत कालावधी गांधीजींनी सावली येथे घालविला. याच काळात गांधीजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा अगदी साध्या पद्धतीने विवाह पार झाला. त्यावेळी ‘जगतवंद्य महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांना मानपत्र’ असा मजकूर असलेला मानपत्र गांधीजींना प्रदान करण्यात आला. खादी कार्यालय अविरतपणे सुरू आहे. पण, काळाच्या स्पर्धेत उत्पादनाने वेग धरला नाही. खादी कार्यालयातून स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक घडामोडी घडल्या. या कालखंडातील आठवणी व घटना भारतीय इतिहासाचा अविभाज्य घटक झाल्या आहेत.