‘एम किसान’ महिन्यापासून बंद
By admin | Published: September 12, 2015 01:58 AM2015-09-12T01:58:38+5:302015-09-12T01:58:38+5:30
शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली.
रूपेश खैरी वर्धा
शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासह कीड व्यवस्थापन व शासनाच्या योजनांची माहिती देण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने ‘एम किसान’ ही एसएमएस योजना अंमलात आणली. ती काही दिवस सुखरूप सुरू राहिली; मात्र गत महिन्यापासून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकही एसएमएस गेला नाही. या यंत्रणेमुळे शासनावर अतिरिक्त आर्थिक भार येत असल्यामुळे ही योजना थेट दिल्ली येथून बंद असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या शेतात पीकं बहरली आहेत. अशात निसर्गाचा लहरीपणा नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आड येत आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडीचा हल्ला होत आहे. याची कृषी विभागाच्यावतीने पाहणी करण्यात येत आहे. यावरील उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता असलेली ही ‘एम किसान’ योजना बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या नव्या रोगांची व पिकांवर आलेल्या सध्याच्या किडवर कसे नियंत्रण मिळवावे याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.
सध्याच्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी सोडविण्याकरिता या एम किसानची गरज भासत आहे. ऐन गरजेच्यावेळी शासनाची ही यंत्रणा शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत आहे. ही योजना केवळ एका वर्धा जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात बंद असल्याचे सांगण्यात आले आहे. ही योजना राबविताना शासनावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड येत असल्याने ही योजना सध्या बंद असल्याचे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयातून कळविले असल्याचे वर्धा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. या योजनेकरिता आणखी किती निधी लागणार यावर होणाऱ्या चर्चेअंती ही योजना राबवावयाची अथवा नाही यावर निर्णय होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेला ‘एम किसान’ येत्या काळात सुरू राहील अथवा नाही या बाबत शंका निर्माण झाली आहे.