म. प्र. पोलिसांना हवा असलेला कुख्यात घरफोड्या अटकेत
By admin | Published: March 3, 2017 01:43 AM2017-03-03T01:43:48+5:302017-03-03T01:43:48+5:30
मध्यप्रदेश पोलिसांना आवश्यक असलेला अट्टल घरफोड्या चरणसिंग गब्बुसिंग भादा याला सावंगी (मेघे) पोलिसांनी दुचाकी चोरीत अटक केली आहे.
सावंगीसह वर्धा व चंद्रपूर येथे गुन्हे
वर्धा : मध्यप्रदेश पोलिसांना आवश्यक असलेला अट्टल घरफोड्या चरणसिंग गब्बुसिंग भादा याला सावंगी (मेघे) पोलिसांनी दुचाकी चोरीत अटक केली आहे. त्याने सावंगीसह वर्धा, चंद्रपूर आणि पांढुर्णा येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. सावंगीच्या गुन्ह्यानंतर त्याला वर्धा पोलीस ताब्यात घेण्यात असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
पोलीस सुत्रानुसार, सावंगी पोलिसांची चमू रात्रगस्तीवर असताना त्यांना एका सुनसान मंदिरात काही इसम अंधाराचा फायदा घेत लपून असल्याचे दिसून आले. यावरून सदर इसमांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी अनेक चोऱ्यांची कबुली दिली. शिवाय सावंगी येथे दुचाकी चारीची कबुली दिली. सावंगी ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याच्याकडे मध्य प्रदेशातील एक दुचाकीही जप्त आढळून आली आहे.
पोलिसांनी चरणसिंग भादा रा. पांढुर्णा याच्यासह गणेश सिंग रा. मोर्शी रा. अमरावती हा यालाही अटक केली आहे. या दोघांनी वर्धा शहरात दोन, सावंगी दोन, चंद्रपूर दोन आणि पांढुर्णा येथील तीन घरफोड्या कबुल केल्या आहेत.
चरणसिंग भादा हा कुख्यात घरफोड्या असल्याची माहिती पोलिसांना कारवाईदरम्यान मिळाली. त्याच्या अटकेची माहिती मिळताच वर्धेसह, चंद्रपूर व पांढुर्णा पोलिसांनी त्याची मागणी केली आहे. प्रारंभी वर्धा पोलिसांनी त्याची मागणी केल्याची माहिती आहे. ही कारवाई सावंगी ठाणेदार संतोष शेगावकरसह सहायक पोलीस उपनिरीक्षक बीसने, प्रदीप राऊत, सघर्षसेन कांबळे, विलास अवचट यांनी केली.(प्रतिनिधी)
एमपीत चोरी करून सावंगीच्या बेड्यावर आश्रय
चरणसिंग भादा हा मध्यप्रदेशातील कुख्यात चोर आहे. तिथे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येथे चोऱ्या करून तो सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिकलकरी बेड्यावर आश्रयाला येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. मध्यप्रदेशात चोऱ्या करून वर्धेलगतच्या बेड्यांवर लपणारे अनेक आरोपी असल्याची माहिती आहे.