निमसडा येथे सील केलेल्या वाळूवर माफियांनी मारला डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:00 AM2020-11-28T05:00:00+5:302020-11-28T05:00:11+5:30
वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून निमसडा शिवारात वाळूचा ढिग सील केला. मात्र, वाळू चोरट्यांनी आपल्याला कुणाचीही भीती नाही असे दाखवत सील केलेला वाळूसाठाच चोरून नेल्याचे उजेडात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : नजीकच्या निमसडा शिवारात यशोदा नदीच्या काठावर धडक कारवाई करून तब्बल ७.५० लाख रुपये किंमतीचा वाळूसाठा सील करण्यात आला होता. पण हिच वाळू या भागातील वाळू तस्करांनी लंपास केल्याने शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. या भागातील वाळू माफिया चक्क सील केलेल्या वाळूचीही चोरी करीत असल्याने त्यांना कुठल्या बड्या अधिकाऱ्याचा आशीर्वाद तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वायगाव भागात सध्या अनेक वाळू तस्कर सक्रीय झाले आहेत. या भागातील वाळू तस्करांडून यशोदा नदीचे पात्र मनमर्जीने पोखरून वाळूची वाहतूक केली जात आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून निमसडा शिवारात वाळूचा ढिग सील केला. मात्र, वाळू चोरट्यांनी आपल्याला कुणाचीही भीती नाही असे दाखवत सील केलेला वाळूसाठाच चोरून नेल्याचे उजेडात आले आहे. निमसड़ा परिसरात तलाठी नदकिशोर मुडे आणि प्रविण हाडे यांनी धडक कारवाई करून सुमारे १२५ ब्रास वाळू जप्त केली होती. या वाळूची किंमत ७ लाख ५० हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. वाळू सील करण्याची कारवाई करताना वाळूच्या ढिगाला चुना लावण्यात आला हाेता. शिवाय हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडून वळते करण्यात आले होते. पण वाळू माफियांनी सील केलेली वाळूच चोरून नेत शासनाला चूना लावला आहे. या प्रकरणी तहसीलदार कठोर भूमिका घेत वाळू चोरट्यांवर फौजदारी कारवाई करतात काय, की चिरी-मिरीचा व्यवहार होत हे प्रकरण दडपले जाईल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. देवळी तालुक्यातील काही वाळू माफिया या भागातून वाळूची चोरी करीत असल्याची माहिती महसूल विभागाला आहे. पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही.
यशोदा नदीपात्र सध्या वाळू माफिया पोखरत आहे. वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी धडक कारवाई करून मौजा निमसडा येथे १२५ ब्रास वाळू सील करण्यात आली होती. अधिक चौकशीदरम्यान ही वाळू अजय बाबाराव कुरटकर यांनी साठवल्याचे पुढे आले होते. शिवाय पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे. सील केलेल्या वाळूची चोरी होऊ शकते असे मत आपण मांडले होते. तर आता सील केलेली वाळू चोरी जात आहे. संबंधितावर तहसील प्रशासन कार्यवाही करणार.
- नदकिशोर मुडे,
तलाठी आलोडा (बोरगाव).