‘महा-देव’ यात्रेची दिल्लीकडे कूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:32 PM2018-07-23T22:32:45+5:302018-07-23T22:33:11+5:30
सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. अतिक्रमण धारकांना घटपट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्या या सायकल यात्रेच्या माध्यमातून रेटल्या जाणार आहेत. या सायकल यात्रा दिल्ली येथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन निवेदनातील मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी अतिक्रमण धारक त्यांना साकडे घालणार आहेत.
सेवाग्राम येथील बापूकुटी येथून सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या सायकल यात्रेची सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही सायकल यात्रा वर्धा शहरात दाखल झाली होती. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर ही ‘महा-देव’ सायकल यात्रा पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.
सायकल यात्रेत सहभागी अतिक्रमण धारक व युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते वर्धा ते दिल्ली हे १ हजार ३०० किमीचे अंतर सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता पूर्ण करणार आहेत. अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात वर्धा ते नागपूर अशी ‘भु-देव’ पायी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पूर्ण केल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांना सोबत घेवून ही ‘महा-देव’ याचा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या सायकल यात्रेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशील ठाकरे, आमिन शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत. ते दिल्ली येथे अतिक्रमण धारकांच्या समस्या मांडणार आहेत.
या आहेत मागण्या
अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावे
अतिक्रमण धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत.
होतकरू तरुण-तरुणांना रोजगार देण्यात यावा.
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्या.
निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध शेतकºयांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन म्हणून द्यावी.
महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.
देशातील आमदार व खासदारांना देण्यात येणारे मानधन बंद करून त्यांची पेन्शन बंद करण्यात यावी. तसेच तात्काळ विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी.