ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:10 PM2023-04-10T14:10:02+5:302023-04-10T14:12:46+5:30
जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार
वर्धा : केंद्रात आणि राज्यातील सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, हुकूमशाही व ठोकशाही पद्धती अवलंबली आहे. यातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. राज्यभरात सात सभांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या दि. १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
स्थानिक इंदिरा सद्भावना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले की, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षाचे उपनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
औरंगाबाद येथून वज्रमूठ सभेची सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये शेवट होणार आहे. या दोन्ही सभेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. पुणे व नाशिक येथील जबाबदारी राष्ट्रवादीने तर नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील जबाबदारी काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष कामाला लागले असून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे १ हजार २०० कार्यकर्ते या सभेला उपस्थित होणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे..
घर म्हटलं की भाड्याला भांडे लागतातच. हा तर पक्ष आहे, यामध्ये मतभेद व विचारभेद असणारच. त्यामुळे उणेदुणे काढण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे. या मतभेदामुळे काँग्रेसपुढे ही वेळ आली आहे. आता तरी दिवस पालटविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही खासदार धानोरकर यांनी केले.