कांचनपूर, वाही गावात महाश्रमदानाचे तुफान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:00 AM2018-05-14T00:00:52+5:302018-05-14T00:00:52+5:30
जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.
या श्रमदानात वैद्यकीय जनजागृती मंच, रेड क्रॉस सोसायटी, आर्वी, आदर्श कॉम्प्युटर क्लासेसच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कांचनपूरच्या सरपंच राजश्री धारगावे आणि ग्रामसेवक बोबडे तसेच सुमेध भस्मे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी मिळून अवघ्या तीन तासांमध्ये श्रमदानातून शेततळे तयार केले.
यावेळी आदर्श कॉम्प्युटरच्या श्रुती पजई आणि आकांक्षा घोंगडे या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांसोबत शेततळ्यातच वाढदिवस साजरा केला. वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी रोपवाटिका तसेच इतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांनी पारंपरिक बासरी आणि डफ वाजवून आलेल्या श्रमदात्यांचे स्वागत केले. कामानंतर श्रमदात्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद ही घेतला.
वाही येथे राजू पावडे, गणेश गजकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय जनजागृती मंचाची चमू तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्वीच्या चमूने भेट देत जवळपास शंभर मीटर लांबीचा कांटूर बांध बनविला. गारपिटीच्या तडाख्याने उदध्वस्त झालेल्या या गावातील महिला पुरुष गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान करताना दिसले. त्यांनी जवळपास सीसीपीचे काम पूर्ण केलेले होते. गावात जवळपास शंभर टक्के शोषखड्डे झालेले असून, रोपवाटिकेमध्ये १ हजार ५०० झाडांची लागवड झालेली आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून न राहता एकजुटीच्या ताकदीने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत.
यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरुण पावडे आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रभाकर राऊत, श्याम भेंडे, सचिन गरपाल, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार, यांच्यासह सदस्य तथा आदर्श कॉम्प्युटरचे मंगेश दिवटे आणि विद्यार्थी, पुलगाव येथून आलेले प्रवीण लोखंडे, प्रवीण होनाडे, अजय अराटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डोसकं फिरलं आता ह्या पाण्यासाठी
तीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे ६०० असली तरी त्यांचे बळ ६ हजार लोकांचे असल्याचे येथे झालेल्या कामावरून दिसून आले. गावात दुष्काळ असतानाही गावकऱ्यांकडून होत असलेल्या कामांकडे कधी पाठ झाली नसल्याचे येथील कामांवरून दिसून आले.