महाबीजच्या सोयाबीन बियाण्यात भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 11:39 PM2018-09-15T23:39:26+5:302018-09-15T23:39:59+5:30
महाबीजच्या सोयाबीन बियाण्यात भेसळीची तक्रार प्राप्त होताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी पवनार गाठून पिकाची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यात भेसळीची तक्रार प्राप्त होताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी पवनार गाठून पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सदर बियाण्यात भेसळ झाल्याचे मान्य केले. शिवाय तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिले.
राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रम योजनेंतर्गत कृषी विभाग वर्धाच्यावतीने चालू खरीप हंगामसाठी जे.एस. ९५६० या कमी कालावधीच्या सोयाबीन बियाण्याचे वाटप काही निवडक शेतकºयांना करण्यात आले. परंतु, सदर वाणामध्ये जे. एस. ३३५ या जास्त कालावधी घेणाºया बियाण्यांची ३० ते ४० टक्के भेसळ झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत पुढे आले आहे. जे. एस. ९५६० हे वाण जवळजवळ कापणीच्या अवस्थेत आहे. तर जे.एस. ३३५ हे वाण हिरवे आहे. या वाणाच्या कापणीसाठी सुमारे २० ते २५ दिवस शिल्लक आहेत. जर एवढे दिवस जे. एस. ९५६० ची कापणी केली नाही तर सर्व शेंगा फुटून दाणे गळून पडतील, असेही पाहणीत पुढे आले आहे. दुसरे पीक घेता यावे म्हणून शेतकऱ्यांनी लवकर येणाºया ९५६० या वाणाची निवड केली. मात्र, भेसळयुक्त बियाण्यामुळे त्याला ३० ते ४० टक्के नुकसान होणार असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला तक्रार प्राप्त होताच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी पवनार गाठून पिकाची पाहणी केली. याप्रसंगी तिडक, सुभाष मुडे, विलास मेघे, प्रशांत भोयर आदी उपस्थित होते.
बियाण्यात भेसळ असल्याचे दिसून येत आहे. सदर बियाणे महाबिजचे आहे. या संदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात येईल. शिवाय चौकशीअंती योग्य कार्यवाही करण्यात येईल.
- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.