महादेवभाई देसाई बनलेय बापूंची सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 11:40 PM2019-08-14T23:40:45+5:302019-08-14T23:41:48+5:30
गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : गांधीजींची ओळख जगाला झाली होती. सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि सामुहिक जीवन पद्धतीमुळे सामान्य ते विद्वान सर्वच स्तरावरील लोकं बापूंकडे आकर्षित झाले होते. बापू १९१५ मध्ये भारतात आले आणि त्यांनी असंख्य युवा वर्गाच्या मनावर अधिराज्य केले. परिणामी युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जुळायला लागला. यात महादेवभाई देसाई यांचाही समावेश होता. ते गांधीभक्त म्हणूनच नावारुपास आले आणि बापूंची सावली बनले. आज स्वातंत्र्यदिनी या गांधीभक्ताची पुण्यतिथी असून आश्रमात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल.
महान स्वातंत्र्य सेनानी महादेवभाई देसाई यांचे १५ आँगस्ट १९४२ रोजी निधन झाले. आज त्यांची ७७ वी पुण्यतिथी आहे. गुजरात राज्यातील सूरत जिल्ह्याच्या सरसगाव या खेड्डयात महादेव यांचा जन्म १ जानेवारी १८९२ मध्ये झाला. वडील हरिहर शिक्षक तर आई जमनाबहन धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यामुळे घरातील वातावरण संस्कारी होते. बालवयातच महादेवभाई आईच्या प्रेमाला मुकले.बालपणापासून ते कुशाग्र बुध्दिमान म्हणून ओळखले जाऊ लागले. मँट्रिकनंतरचे त्यांनी शिक्षण शिष्यवृत्ती वर पूर्ण केले. शिकत असतानाच त्यांचा विवाह दुर्गाशी झाला. त्यांना नारायण एकमात्र पूत्र होते. मुंबई सेंट्रल को आँप-रेटिव्ह बँकेत नोकरी करीत असताना होमरुल लिगमध्ये काम करण्याची इच्छा झाली. त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले.मित्र नरहरी पारेख यांच्या माध्यमातून महादेवभाईची बापूसोबत पहिली भेट झाली. त्यांनतर त्यांनी बापूृंचे सचिव म्हणून १०० रुपयात काम सुरु केले. पण, सहवासात आल्यानंतर ७५ रुपयात काम करणे पसंत केले. यातूनच कमीत कमी गरजा ठेऊन कसे जगता येईल याची चांगली सवय अंगवळणी बांधली. पुढे ते बापूंचे खऱ्या अर्थाने मानसपुत्र बनले.
सेवाग्राम आश्रमची स्थापना करण्यात आल्यानंतर महादेवभाई, दुर्गाबहन आणि नारायण मगनवाडीतून सेवाग्राम आश्रमात आले. आश्रमातील बलवंतसिंह आपल्या पुस्तकात लिहिताना म्हणतात ‘परमहंस रामकृष्ण यांनी स्वामी विवेकानंद यांना ओळखले तसेच बापूंनी महादेव यांना ओळखून महादेव यांचा जन्म माझ्यासाठीच झाला’. दोघांतील जीवन पाहता बापूंचे वाक्य खरेच ठरले. महादेवभाई यांनी २५ वर्षे गांधीजी आणि देशाची सेवा केली. सर्व मित्र त्यांना ‘दरिया दिल’ म्हणत. वर्धेत काँग्रेस वर्कींग कमेटीच्या बैठकीत त्यांचा सहभाग होता. तसेच आदिनिवासमध्ये भारत छोडोचा मसुदा तयार करण्यात आला, तेव्हाही ते उपस्थित होते. ५ आॅगस्ट १९४२ ला मुंबई येथे काँग्रेस वर्कींग कमेटिच्या बैठकीला मुंबईला जाणार होते. त्यावेळी ते सर्व आश्रमवासियांना भेटले आणि हीच त्यांची शेवटची भेट ठरली. मुंबईतील बैठकीनंतर गवालिया टँक मैदानावर सभा झाली आणि भारत छोडोचा ठराव पारीत होऊन गांधीजींनी देशवासियांना संबोधित केले. याचे साक्षीदार ते होते. पण, ९ रोजी पहाटे गांधीजींना अटक झाली. त्यानंतर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व कस्तुरबा यांनी केले. त्यांना महादेवभाईने खंबीरपणे साथ दिली. त्यानंतर कस्तुरबा, महादेवभाई आणि अन्य नेत्यांना अटक करून पुण्याच्या आगाखान पँलेस मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. बापुंनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे महादेवभाईंना कळले आणि तिथेच त्यांना भोवळ आली. याची माहिती मिळताच बापू, बा, डॉ. सुशिला नायर आले. पण, तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. महादेवची जागा कुणीच घेऊ शकत नाही, महादेव माझी जीवनी लिहिणारे बणणार होते. पण, माझ्या अगोदरच निघून गेले. माझा अंतसंस्कार तू करावा अशी माझी भावना होती. मात्र, आई वडिलांच्या अगोदर पुत्राचे निधन अधिक क्लेशदायक आहे, असे बापूचं उद्गारही बाहेर पडले होते. आज त्यांचाच स्मृतिदिन आहे.
बापूंचे सचिव म्हणून स्वीकारली जबाबदारी
महादेवभाई यांचे मित्र नरहरी पारेख यांच्या माध्यमातून अहमदाबाद येथे बापूंसोबत पहिली भेट झाली. यानंतर नरहरी आणि महादेवभाई यांची गांधीजी सोबत चर्चा झाली. यातूनच ३१ आँगस्ट १९१७ ला बापूंचे सचिव म्हणून १०० रूपयावर महादेवभाई यांनी काम सुरू केले.