महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:06+5:30
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखण्यासोबतच गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धेकरांकडून नियम पायदळी तुडविले जात असल्याचे शुक्रवारी भाजी बाजारात दिसून आले.
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या अनुषंगाने भाजी विक्रीच्या दुकानासमोर चुन्याने आखणीही करण्यात आली. याला ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी बाजार महादेवपुरा येथे हलविण्यात आला. तर स्वावलंबी मैदानावरील भाजी बाजार तेथेच आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी भरणाºया भाजी बाजारात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शुक्रवारी महादेवपुºयातील भाजी बाजारात पदोपदी सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होताना दिसली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि नागरिकांच्या झालेल्या गर्दीमुळे जमावबंदी कायद्याचेही येथे सर्रास उल्लंघन होत होते. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी स्वत: जागरूक असण्यासोबतच काळजी घेणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिक आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात नागरिकांनी दररोजच भाजी बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.
वर्ध्यात मात्र, नागरिकांकडून रस्त्यांवर अनावश्यक फिरणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आदी कृत्य करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे सुज्ञ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.