यंदाच्या दिवाळीत महालक्ष्मी मूर्तीकारांवर प्रसन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:18 PM2017-10-15T23:18:19+5:302017-10-15T23:18:55+5:30
प्रकाशाचा सन दिवाळी. दोन दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त विविध साहित्याने बाजार सजला आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रकाशाचा सन दिवाळी. दोन दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त विविध साहित्याने बाजार सजला आहे. यात अनेक सजावटींच्या वस्तूंसह पूजनाकरिता वापरण्यात येणारे साहित्यही आहे. यात महत्त्वाची असलेली महालक्ष्मीची मूर्ती अनेकांना आकर्षित करणारी ठरत आहे. बाजारपेठेत महालक्ष्मीच्या मूर्ती कमीत कमी २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. यंदाचे विशेष म्हणजे सजविलेल्या मूर्ती बाजारात आल्याने त्या खरेदी करण्याकरिता गर्दी उसळत आहे. यामुळे यंदाच्या दिवाळीत महालक्ष्मी मूर्तीकारांवर प्रसन्न असल्याचे बोलले जात आहे.
वर्धा शहरातील बाजारपेठेत स्थानिक मूर्तीकारांसह परिसरातील मूर्तीकारांनी तयार केलेल्या महालक्ष्मीच्या मूर्ती विक्रीकरिता आल्या आहेत. या कलाकारांनी आकर्षक वस्तूंनी सजविलेल्या मूर्ती नागरिकांच्या भुरळच घालतात. बाजारपेठेत २०० रुपयांपासून ते १ हजार ५०० रुपयांपर्यंतच्या आकर्षक सजावट केलेल्या मूर्ती विक्रीकरिता आहेत. केवळ वर्धेतीलच नाही तर जिल्ह्याबाहेरील मूर्तींची येथे आवक झाली आहे. लक्ष्मीचा सण म्हणून ओळख असलेल्या सणाला अनेक युवकांकडून विविध व्यवसाय करून रोजगार साधले आहे. गत वर्षीच्या तूलनेत मूर्तींच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. मूर्तीच्या दरात वाढ झाली तरी मूर्ती खरेदीसाठी गर्दी उसळत आहे.
तरुणांना मिळाला रोजगार
दिवाळी या सणासाठी वर्धा बाजारपेठ सजली असून ठिकठिकाणी विविध साहित्याचे दुकाने लागली आहे. अनेक होतकरू तरुणांनी दिवाळी निमित्त छोटे व्यवसाय थाटले असून त्यांना दिवाळी या सणाने रोजगार उपलब्ध करून दिल्याचे बघावयास मिळते.
अमरावती व अकोल्याच्या मूर्ती वर्धेत
दिवाळी या सणानिमित्त नागरिकांकरवी पूजेसाठी महालक्ष्मीच्या मूर्तीची मागणी असते. सध्या बाजारपेठेत काही ठिकाणी अमरावती व अकोला येथून खरेदी केलेल्या मूर्ती आकर्षक सजवून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आकर्षक दिसणाºया या मूर्ती नागरिकांना भुरळच घालतात.
यंदा मूर्तींच्या दरात सुमारे १५ टक्के वाढ झाली आहे. सध्या बाजारपेठेत नागरिकही मूर्ती खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. सजविलेल्या मूर्तींना नागरिक पसंती देत आहेत.
- प्रदीप बावने, मूर्ती विक्रेता, वर्धा.