Maharashtra Election 2019 ; सात उमेदवारांचे नामांकनपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 06:00 AM2019-10-06T06:00:00+5:302019-10-06T06:00:30+5:30
हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात छाननीदरम्यान ७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट मतदारसंघातील उमेदवार अतुल वांदिले यांच्यासह आर्वी, देवळी वर्धा मतदार संघातून प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. एकूण ५७ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान वैध ठरले आहेत.
आर्वी मतदारसंघात एकूण १२ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले होते. छाननीदरम्यान बसपचे सुनील देशमुख व अपक्ष माधव देशमुख यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. आर्वी मतदारसंघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. देवळी मतदार संघात २१ उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी २ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान रद्द झाले. यामध्ये जय महाभारत पार्टीचे सुनील पाटील व भाजपचे दिनेश किसना शिरभाते यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आता येथे १९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.
हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत. ७ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची दिनांक असून त्यानंतर मतदार संघातील लढती व उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी छाननी झाल्यानंतर रविवारी ६ ऑक्टोबरला सुटी आल्याने प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
मनसे उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने खळबळ
हिंगणघाट - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी १८ उमेदवारांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांनी उमेदवारी अर्जासोबत नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून शनिवारी अर्जाच्या छाननीपूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जांच्या छाननीपर्यंत वांदिले यांनी नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिली. आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १७ उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष अॅड. सुधीर कोठारी, बसपचे विलास नानाजी टेंभरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे डॉ. उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दमडू वारलू मडावी, लोकजागर पाटीर्चे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. शनिवारी छाननीनंतर एकूण १७ उमेदवार मैदानात आहेत. सोमवारी, ७ ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
सर्वाधिक उमेदवार देवळीत
सर्वाधिक १९ उमेदवारी अर्ज देवळी मतदारसंघात छाननीनंतर शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांचे चिन्ह दिले जाऊ शकतात. उमेदवारांचा आकडा वाढल्यास दुसरी ईव्हीएम मशीन द्यावी लागेल. त्यामुळे छाननीनंतरच या बाबीचे नियोजन प्रशासन करेल. सद्यस्थितीत वर्धा व आर्वीत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी १० तर देवळीत १९ व हिंगणघाटमध्ये १८ उमेदवार मैदानात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षी हिंगणघाट मतदारसंघात एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.