Maharashtra Election 2019 ; सहा पदव्युत्तर तर पाच अंडरग्रॅज्युएट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:04+5:30
यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
आनंद इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासकीय कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळविण्याकरिता बारावी उत्तीर्ण हवे; पण राजकारणात शिक्षणाची कोणतीही अट नसल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची ओरड नेहमीच मतदारांकडून केली जाते.पण, यावर्षी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे उच्च अंडरग्रॅज्युएट तर सहा उमेदवार हे पदव्युत्तर आहेत.
यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्जाच्या छाननीनंतर ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व उमेदवारांपैकी चारही मतदारसंघातील ११ प्रमुख उमेदवारांच्या शपथपत्रावरून शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला आहे. यात वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीतील काँग्रेसचे रणजित कांबळे, शिवसेनेचे समीर देशमुख, अपक्ष राजेश बकाने, हिंगणघाटमधील भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, अपक्ष अॅड. सुधीर कोठारी. तर आर्वी मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे व भाजपचे दादाराव केचे यांचा समावेश आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये सहा उमेदवार पदव्युत्तर असून त्यात डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर देशमुख, सुधीर कोठारी, राजू तिमांडे व दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर उर्वरित पाच उमेदवार हे बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट आहेत.
उच्चशिक्षितांचा वाढतोय कल
जिल्ह्यातील चारही मतदार संघातील प्रमुख उमेदवारांपैकी प्रत्येक मतदार संघातून एक ते दोन उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उच्चशिक्षितांचाही राजकारणाकडे कल वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.