धक्कादायक! विजेची तार तोंडात धरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या, मदतीच्या प्रतीक्षेत गेला आणखी एक जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:01 AM2022-08-21T06:01:00+5:302022-08-21T06:01:18+5:30
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली.
वर्धा :
यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरुवातीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंतर केंद्रीय पथक, तर शुक्रवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी शासकीय मदतीकडे डोळे लावून बसले असतानाच भदाडी नदीच्या पुरात पीक खरडून गेलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिवंत विद्युत तार तोंडात घेऊन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. गणेश श्रावण माडेकर (वय ३६, रा. पढेगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यांतर्गत पढेगाव येथील गणेश माडेकर यांच्याकडे साडेसहा एकर शेती आहे. त्यांनी तूर, सोयाबीन व कपाशीची लागवड केली. अंकुरलेल्या पिकाची बऱ्यापैकी वाढ होत असतानाच अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. त्यात माडेकर यांच्या शेतातील संपूर्ण पीक खरडून गेले. नेत्यांसह केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी केल्याने लवकरच शासकीय मदत मिळेल, अशी आशा त्याला होती; पण हवालदिल झालेल्या गणेश यांचे मनोधैर्य खचले. त्यातच त्यांनी प्रवाहित वीज तार तोंडात धरून जीवनयात्रा संपविली. सावंगी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
पढेगावावर पसरली शोककळा
गणेश माडेकर याच्या पश्चात पत्नी, आठ वर्षीय मुलगा, सहा वर्षीय मुलगी तसेच वयोवृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. गणेशच्या आत्महत्येमुळे माडेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पढेगावात शोककळा पसरली आहे.