९ ते १५ ॲागस्टपर्यंत राज्यभर ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान; मविआला सहकार्य!
By रवींद्र चांदेकर | Published: July 11, 2024 10:46 PM2024-07-11T22:46:11+5:302024-07-11T22:49:25+5:30
सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले.
वर्धा: लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यात मिळविलेले यश मर्यादित असले, तरी आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दगाबाजी व बेकायदेशीररीत्या लादलेले भाजप सरकार घालवून महाविकास आघाडीला संपूर्ण यश मिळवून देण्याचा निर्धार भारत जोडो अभियानच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यासाठी राज्यात ९ ते १५ ऑगस्टपर्यंत ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले. त्यात विविध ठराव आणि निर्णय घेण्यात आले. त्यात ९ ॲागस्टला मुंबईत ॲागस्ट क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. स्वाभिमानी, समृद्ध, समतावादी व सहिष्णू महाराष्ट्र निर्मितीसीठी भारत जोडो अभियानची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली. ‘केंद्र व राज्य सरकार हिसाब करो-जबाब दो’ अभियान राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कर रूपाने व औद्योगिक उलाढालीत राज्याचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे. नवे प्रकल्प परराज्यात न जाऊ देता राज्याचा विकास करावा. शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचा घसरलेला संयुक्त महाराष्ट्र पुन्हा सावरूया. भाजपाच्या अयोध्येतील परभवाने सांप्रदायिक धार बोथट होत असल्याने राज्यातही दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याकांना न्याय हवा, अशा मागण्याही अधिवेशनात करण्यात आल्या.
ओबीसीविरुद्ध मराठा लढाई राज्यासाठी घातक
राज्यात सुरू असलेली ओबीसीविरुद्ध मराठा लढाई ही भाजपाचा खेळ असल्याचा आरोप अधिवेशनात करण्यात आला. यावेळी अभियानच्या विभागीय समित्या गठित करण्यात आल्या. त्यात विदर्भ समन्वयक - अविनाश काकडे, रुबिना पटेल, प्रशांत ठाकरे, मराठवाडा- सुभाष लोमटे, दत्ता तुमवाड, कोकण- मुक्ता श्रीवास्तव, राजन इंदुलकर, पश्चिम महाराष्ट्र- मानव कांबळे, संदीप बर्वे, तर उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून अविनाश पाटील, जालिंदर अडसुळे यांची निवड करण्यात आली. प्रदेश प्रशिक्षण समितीत राजू भिसे, प्रा. नूतन माळवी, निश्चय म्हात्रे, महाराष्ट्र समन्वयक म्हणून उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगला गोपाल यांची निवड झाल्याचे विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी सांगितले.