राज्य कुस्तीगीर परिषद वर्गणीवर चालविण्याची आली वेळ; रामदास तडस यांची लांडगेवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 11:19 AM2022-11-04T11:19:46+5:302022-11-04T11:19:54+5:30
बाळासाहेब लांडगे यांनी स्पर्धांच्या आयोजनात लुडबुड करू नये, असे आवाहनही तडस यांनी केले आहे.
वर्धा : राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी ऑल इंडिया कुस्तीगीर संघाने बरखास्त केली होती. मागील तीन वर्षांत राज्य कुस्तीगीर परिषदेचे काम अतिशय निष्क्रिय राहिले. एकेकाळी महाराष्ट्राचा कुस्तीत असलेला लौकिक मातीत मिळाला. आता कुस्तीगीर परिषदेचे सूत्र अध्यक्ष म्हणून आपण न्यायालयाच्या आदेशानुसार हाती घेतले आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेकडे कुठलाही निधी शिल्लक राहिलेला नाही. आम्हा लोकांवर वर्गणी करून राज्य कुस्तीगीर परिषदेचे कामकाज चालविण्याची वेळ आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली आहे.
राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. ऑल इंडिया कुस्तीगीर परिषदेने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्याने निवडणुका लागल्या. मागील १० वर्षांत कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी एकही राष्ट्रीय स्पर्धा राज्यात घेतली नाही. याबाबत अनेकदा आपण व इतर सदस्यांनी पत्रव्यवहार केला; परंतु, राज्य पातळीवर, देशपातळीवर एकही स्पर्धा महाराष्ट्र परिषदेने आयोजित केलेली नाही.
निवडणूक जाहीर झाल्यावर काहीजण न्यायालयात गेले. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आम्ही आता काम सुरू केले आहे. लवकरच राज्यात राष्ट्रीय व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १५ ते ३० डिसेंबरदरम्यान पुणे येथे कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ याची तयारी करीत आहे, असेही खासदार रामदास तडस यांनी सांगितले. बाळासाहेब लांडगे यांनी स्पर्धांच्या आयोजनात लुडबुड करू नये, असे आवाहनही तडस यांनी केले आहे.
पंजाब, हरयाणा गेला पुढे
- महाराष्ट्राच्या मातीत कुस्ती स्पर्धेला नेहमीच राजाश्रय मिळाला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून शरद पवार साहेबांनीही कुस्तीला प्रोत्साहन दिले; परंतु, मागील १० वर्षांच्या काळात कुस्तीगीर परिषदेच्या निष्क्रियतेमुळे राज्याचा लौकिक ढासळला व पंजाब, हरयाणा हे राज्य कुस्तीत पुढे गेले, अशी खंत तडस यांनी व्यक्त केली. विदर्भ कुस्तीगीर परिषदेलाही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यता देऊन विदर्भाच्या मातीतूनही चांगले मल्ल तयार केले जातील, असेही तडस यांनी सांगितले.