वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला मिळाली कोरोना चाचणीची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 02:55 PM2020-04-24T14:55:28+5:302020-04-24T14:55:48+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भातनागपूर, अकोलानंतर आता वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोना चाचणी प्रयोगशाळेची संख्या वाढविण्यात येत आहे. विदर्भातनागपूर, अकोलानंतर आता वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेला कोरोना चाचणीची परवानगी नागपूर येथील भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमार्फत मिळाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व कोरोना चाचणी येथेच करता येतील. ही वर्धा जिल्ह्यासाठी आनंददायक बातमी आहे.
वर्ध्यातील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम यांनी 16 मार्चला कोरोना चाचणी परवानगी मिळण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे प्रस्ताव पाठवला होता. त्याअनुषंगाने भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेच्या संचालक आणि नागपूर एम्स च्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापक यांनी सेवाग्राम महाविद्यालयातील आवश्यक सुविधांची ऑनलाईन तपासणी केली. चाचणीसाठी मान्यताप्राप्त उपकरणे ,आवश्यक कागदपत्रे , भौतिक सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी वर्ग याच्या तापसणीसोबतच त्यांना चाचणी साठी स्त्राव नमुना पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या मानांकणाप्रमाणे 100 टक्के जुळल्यानंतर सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्था कोरोना चाचणी करण्यासाठी योग्य असल्याचा अहवाल दिला.
आज महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता नितीन गंगणे यांना नागपूर एम्स कडून कोरोना चाचणीसाठी परवानगी मिळाल्याचे पत्र प्राप्त होताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना कळवले.
यावेळीं गंगणे म्हणाले, आयुर्विज्ञान संस्थेतील एक सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि तीन तंत्रज्ञ यांचे एम्स येथे चाचणीसंदर्•ाात प्रशक्षण झाले आहे. महाविद्यालयात पूर्वीच बीएसएल - 3 प्रयोगशाळा आहे. पूर्वी ही प्रयोगशाळा क्षयरोग कल्चर चाचणीसाठी वापरली जात होती. आता ती कोरोना चाचणी प्रयोगशाळेत रूपांतरित केली आहे. प्रयोगशाळेत उणे 20,आणि 80 तापमानावर यासंदर्भात टेस्टिंग एजंट ठेवण्याची सुविधा आहे. कोरोना चाचणी आम्ही नागपूर एम्स च्या मार्गदर्शनाखाली करणार असून यासाठी टेस्टिंग किट भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेमार्फत पुरविण्यात येणार आहे. या मान्यतेमुळे आमच्या संस्थेतील सुविधा उच्च दर्जाच्या असल्याची ही पोचपावती मिळाली आहे अशी प्रतिक्रिया नितीन गंगणे यांनी व्यक्त केली.
तपासणीची सुविधा वर्धेतच उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण कार्य करता येईल. 1150 चमू तयार केल्या आहेत. या चमू घरोघरी जाऊन नागरिकांना ताप ,सर्दी ,खोकला, श्वास घ्यायला त्रास आदी लक्षणांबाबत माहिती घेणार आहेत. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय प्रथमिक आरोग्य केंद्रात फिव्हर क्लीनिकची सुविधा केली आहे. तिथे येणाऱ्या तापाच्या रुग्णांचे स्त्राव आता टेस्टिंगसाठी पाठवता येतील. कुणी संशयित वाटत असेल तर त्याची चाचणी वर्धेतच होणार असल्यामुळे अहवाल लवकर प्राप्त होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. वर्धा जिल्ह्याला या परवानगीमुळे मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली.