माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियानाच्या जनजागृतीने महात्मा गांधी जयंती सप्ताहाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 03:16 PM2020-10-10T15:16:50+5:302020-10-10T15:18:29+5:30
Mahatma Gandhi Jayanti Week Wardha News राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोप आज पूर्ण जिल्ह्यात सायकल रॅलीने करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान जितकं यशस्वीपणे राबवू तेवढं आपल्याला कोरोनावर नियंत्रण करणे सोपे जाईल. कोरोनावर लस यायला किती कालावधी लागेल हे अजूनही निश्चित सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घेऊन स्वत:चा बचाव करणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. हात वारंवार स्वच्छ धुणे, बाहेर जाताना कायम मास्कचा वापर करणे आणि सुरक्षित अंतर राखून बाजारात, गर्दीच्या ठिकाणी वावरणे हे तीन नियम पाळले तर आपण स्वत:ला आणि कुटुंबाला या विषाणूच्या संसगार्पासून दूर ठेऊ शकतो. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती निमित्त साजरा करण्यात आलेल्या सप्ताहाचा समारोप आज पूर्ण जिल्ह्यात सायकल रॅलीने करण्यात आला. महात्मा गांधी यांच्या विचारांची आणि 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कोरोना मुक्ती अभियानाची जनजागृती यावेळी करण्यात आली.
सेवाग्राम आश्रम, गांधी चौक, बजाज चौक, आणि आर्वी नाका येथून अनुक्रमे सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, आमदार रणजित कांबळे,खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. चार रॅलीतील सायकल स्वारानी संपूर्ण शहर फिरून जनजागृती केली. रॅलीचा समारोप गांधी चौक येथे नगराध्यक्ष अतुल तराळे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करून वितरण करण्यात आले. या रॅलीच्या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.
नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांची जयंती सप्ताहभर नियमांचे पालन करून साजरी केली. या महामारीच्या काळात आपल्या कुटुंबाला या विषाणू पासून दूर ठेवण्यासाठी काळजी घ्यायची आहे. ही जबाबदारी प्रत्येकाने स्विकारली तर कोरोनाचा संसर्ग कमी होऊन महाराष्ट्र या संकटातुन लवकरच मुक्त होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे या अभिनंदन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी स्वत: सायकल चालवत सहभाग घेतला. तसेच उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सचिन पावडे सतीश जगताप अजय वानखेडे, श्याम भेंडे, मंगेश दिवटे, संजय दुरतकर यांनीही सायकल चालवून माझे कुटुंब माझी जबाबदारीचा संदेश दिला.
दरम्यान आर्वी येथे आमदार दादाराव केचे यांनी, कारंजा येथे जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, देवळी येथे आमदार रणजीत कांबळे, हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावर तसेच पुलगाव, सेलू, सिंदी रेल्वे, समुद्रपूर येथे तेथिल नगराध्यक्ष व तहसिलदार यांनी सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली.