महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम झाला ‘हायटेक’
By admin | Published: December 3, 2015 02:33 AM2015-12-03T02:33:23+5:302015-12-03T02:33:23+5:30
आश्रमाचे संकेतस्थळ रूजू : यात्री निवास येथील सभागृहही यात्रेकरूंसाठी खुले
आश्रमाचे संकेतस्थळ रूजू : यात्री निवास येथील सभागृहही यात्रेकरूंसाठी खुले
सेवाग्राम : महात्मा गांधी यांचा येथील आश्रमही आता ‘हायटेक’ झाला आहे. सेवाग्राम प्रतिष्ठाण आश्रम परिसरात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. आता सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने संकेतस्थळही विकसित केले आहे. ‘बापू कुटी सेवाग्राम’ हे संकेतस्थळ व यात्री निवासमधील सभागृह जिल्हाधिकारी आशुतोष सलील व शिक्षा मंडळाचे प्रधान संजय भार्गव यांनी मंगळवारी जनतेकरिता रूजू केले.
यात्री निवास येथे आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, शिक्षा मंडळाचे प्रधान संजय भार्गव, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव, गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, अधीक्षक भावेश चव्हाण आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी केले. याप्रंसगी जिल्हाधिकारी सलील म्हणाले, आश्रमात नवा बदल होताना दिसून येत आहे. सकारात्मक बदल आश्रमााठी फायद्याचा असून बजाज समूहाचे सहकार्य आश्रमला लाभत असल्याने मदत नक्कीच स्वागतार्ह आहे. भार्गव यांनी भविष्यात गांधी विचारांची प्रकर्षाने जगाला गरज पडणार आहे. त्यांच्या विचारांचे कार्य झाले पाहिजे. गांधीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. महोदय यांनी गांधीजींच्या रचनात्मक कार्यक्रमावर चालणाऱ्या अनेक संस्था आहेत; पण यावर चिंतन व आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. मठकर यांनी आश्रमाच्या माध्यमातून गांधी युवक-युवतीपर्यंत पोहोचावा, स्वच्छता, खादी व कृषीकडे युवकांनी वळावे. आश्रमात सूत ते कपडा उत्पादनाचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अभय मलिमे व रवींद्र बैस यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.डॉ. जाधव यांनी केले. कार्यक्रमाला भैय्या मसानकर, अशोक गिरी, हिराभाई, बाबाराव खैरकार, सिद्धेश्वर उंबरकर, बाबुलाल गणविर, नामदेव ढोले, प्रशांत ताकसांडे, डॉ. शिवचरण ठाकूर, जथ्थू चव्हाण, सरपंच रोशना जामलेकर, गीता कुमरे, मंदा कापसे, पंचफुला सहारे, माधुरी भोगे, प्रभा शहाणे, अश्विनी बघेल व कार्यकर्ते उपस्थित होते.(वार्ताहर)
आश्रमाची माहितीही आता एका ‘क्लिक’वर
काहीच दिवसांपूर्वी सेवाग्राम आश्रम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यानंतर आता सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे संकेतस्थळ विकसित करण्यात आल्याने बापूकुटी हायटेक होत असल्याचेच दिसून येत आहे. या संकेतस्थळामुळे आश्रमाबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय यात्री निवास येथीन अन्य सुविधाही आॅनलाईन होणार असल्याने पर्यटकांची गैरसोय दूर होणार आहे.