महात्मा गांधींची विचार दृष्टी जगासाठी प्रासंगिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:38 PM2019-08-20T23:38:38+5:302019-08-20T23:41:15+5:30
महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव होत असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव होत असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.
भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ाांधी आणि त्यांची समसामयिक प्रासंगिकता : समाज, संस्कृती आणि स्वराज या विषयावर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर प्रा. रामजी सिंह, प्रा. सतीशचंद्र मित्तल, डॉ. बालमुकुंद पाण्डेय, प्रा. कुमार रतनम्, प्रा. अरविंद जामखेडकर आदींची उपस्थिती होती.
प्रा. रामजी सिंह म्हणाले की, गांधीजी संपूर्ण विश्वाचे आहेत. त्यांची १५० वी जयंती साजरी करणे हा आपला धर्म आहे. आज संपूर्ण विश्व गांधीजीच्या विचाराकडे बघत आहे. त्यांच्या प्रासंगिकतेला कोणी विरोध करू शकत नाही. गांधीजीनी आध्यात्मिक अभियांत्रिकी सोबत सामाजिक अभियात्रिकीची जोड दिली होती. व्यक्तिच्या विकासाकरिता त्यांनी एकादश व्रत दिले. तर समस्त समाजाच्या विकासासाठी १८ कार्यक्रम दिलेत. गांधीजीच्या सात्विक दृष्टीने समाज निर्माण करण्यासाठी आम्हाला विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रा. कुमार रतनम् म्हणाले की, गांधी जीवन, विचार आणि तत्वज्ञान आहे. ते राष्ट्रभाषेचा विचार करत रामराज्य स्थापनेची कल्पना करतात. गांधी आर्थिक विचारांचे परिचायक आहे. गांधीजीच्या विचारांची पुनर्स्थापना करण्याची वेळ आता आली आहे असे ते म्हणाले. गांधीजीचे भारतीय परिस्थिती सोबत तादात्म्य दिसते. दैहिक तापांपासून परावृत्त होऊन जगण्याचा विचार त्यांचे तत्वज्ञान सांगते. गांधीजीकडे सात्विक शक्ती असून त्यांचे स्वराज्या पासून तर खादीपर्यंतचे विचार आजही प्रासंगिक आहेत, असे डॉ. बालमुकुंद पांडेय यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोदकुमार यांनी केले तर आभार कुलसचिव प्रा.कृष्णकुमार सिंह यांनी मानले. याप्रसंगी माजी कुलगुरू प्रा. जी. गोपीनाथन, के. एम. मालती, अनंतराम त्रिपाठी, जवाहर कर्नावट, हेमचंद्र वैद्य, हितेंद्र पटेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
शांतीकरिता त्यांचे विचार व एकात्मता प्रासंगिक - अरविंद जामखेडकर
दक्षिण अफ्रीकेच्या स्वातंत्र्याकरिता गांधीजी प्रेरणेचे स्त्रोत बनले. शांततेकरिता त्यांचे विचार व एकात्मता प्रासंगिक आहे, असे यावेळी भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद जामखेडकर यांनी सांगितले. त्यांनी गांधीजींच्या विषयी उपस्थितांना माहिती दिली.
चार तत्त्व गांधी विचाराचा महत्त्वाचा आधार - सतीशचंद्र मित्तल
सत्य, अहिंसा, परस्पर प्रेम आणि आध्यात्मिकता हे चार महत्वपूर्ण तत्व गांधी विचाराचा महत्वाचा आधार आहे, असे याप्रसंगी प्रा. सतीशचंद्र मित्तल यांनी स्पष्ट केले.
शिवाय त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचार हे कसे आजही प्रेरक आहेत याची माहिती दिली.