हनुमान टेकडीवर १२०० वृक्षांचे महावृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:29 PM2018-07-02T22:29:14+5:302018-07-02T22:29:48+5:30
शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षारोपण करावयाचे ठरविले आहे. त्याची सुरुवात वैद्यकीय जनजागृती मंच वर्धाच्या पुढाकाराने रविवारी हनुमान टेकडीवर करण्यात आली.यावेळी पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्षारोपण करावयाचे ठरविले आहे. त्याची सुरुवात वैद्यकीय जनजागृती मंच वर्धाच्या पुढाकाराने रविवारी हनुमान टेकडीवर करण्यात आली.यावेळी पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली प्रामुख्याने उपस्थित होते.प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर ,जिल्हाधिकारी शैलेश नवाल ,पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू गिरीश्वर मिश्र, उपवनसंरक्षक सुनील शर्मा,वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुरव, सुहास बढेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड, वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रमुख डॉ सचिन पावडे आदी मान्यवर उपस्थितीत होते. आधारवड कट्टा, बहार नेचर फौऊंडेशन, लायन्स क्लब,आदर्श कॉम्पुटरचे विद्यार्थी, अक्सिस करिअर अकॅडमीचे विद्यार्थी,युवा सोशल फोरम ,जनहित मंच, निसर्ग सेवा समिती तसेच वर्धेतील विविध सामाजिक संघटनेचे सदस्य ,विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी,नागरिक यांच्या सहकार्याने हनुमान टेकडीवर जवळपास १२०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या आर्थिक सहाय्यातून हनुमान टेकडीवर लावण्यात आलेल्या ड्रीप इर्रिगेशन सिस्टिमचे यावेळी उदघाटन करण्यात आले.
तसेच वैद्यकीय जनजागृती मंचाचे सदस्य आणि लोकसहभागातून निधी गोळा करून टेकडीला आॅक्सिजन झोन बनविण्यासाठी महत्वाचे रेन गन प्रकल्पाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कडुनिंब,पिंपळ,शिसू इ प्रकारच्या विविध वृक्षांचे वृक्षारोपण करताना वर्धेकरांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. जवळपास ७०० वर्धेकर नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवून हनुमान टेकडीला आॅक्सिजन पार्कची मान्यता दिली. कार्यक्रमाची विशेष व्यवस्था वैद्यकीय जनजागृती मंचाच्या सदस्यांनी केली. मंगेश दिवटे आणि महेश अडसुले यांच्याकडून सर्व श्रमदात्यांना जेवणाची व्यवस्था तसेच संगीतमय आल्हाददायक वातावरण निर्मितीसाठी डी जे संगीताची व्यवस्था करण्यात आलेली होती. बहार नेचर फौंडेशनद्वारे वर्धा शहर पक्षी निवडणूक करीता मतदान बूथ तयार करण्यात आले होते त्यामध्ये वर्धेकरांनी मतदान केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य केशवराव खरडे, रमेश खुरगे, यांनीही या परिसरात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले. जलशुद्धीकरण केंद्र आय.टी.आय टेकडी परिसरात निसर्ग सेवा समिती सन २००० पासून वृक्षारोपण करून करित आहे. या कार्याचा आढावा मुरलीधर बेलखोडे यांनी मांडला. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या नेतृत्वात मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संघटना येथे वर्षभर वृक्षारोपण कार्यक्रम करून त्याचे संवर्धन करीत आहे. त्यामुळे भविष्यात टेकडी परिसरात हिरवीकंच वनराई निर्माण होणार आहे. हा परिसर वर्धेकरांसाठी आॅक्सीजन पार्क म्हणून काम करेल. असा विश्वास वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रमुख डॉ. सचिन पावडे यांनी व्यक्त केला.
डॉक्टरांचा वृक्षारोपणात मोठा सहभाग
१ जुलै रोजी डॉक्टर्स डे असल्याने शहरातील अनेक डॉक्टरांच्या संघटनांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. या वृक्षारोपण कार्यक्रमाला डॉ. पंकज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा या वृक्षारोपण कार्यक्रमात मोठा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड यांनी टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
आमदारांनी लावले वृक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आय.टी.आय. टेकडी येथे रविवारी महावृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. प्रथम आमदार पंकज भोयर याच्या हस्ते वड, पिंपळ, आवळा, बेल व जांभूळ या पाच वृक्षांची पूजा करून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्ष अतुल तराळे याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आय टी. स्कॅन कॉम्पुटर इन्स्टिट्यूट, महिला आश्रम, वर्धा येथील ५० ते ६० विदयार्थी व त्यांचे शिक्षक सचिन उमाटे , राहुल घोडे, कमला नेहरू विद्यालय येथील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, नगरपरिषदचे कर्मचारी, सुनील बुरांडे व त्यांचे सर्व सहकारी , नागरीक महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ सातव आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत पिंपळ, मोह, वड, कडुनिंब, जांभूळ, बेहाडा, पेल्ट्राफॉर्म या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी बा.दे. हांडे उपस्थित होते. संचालन प्रा.रितेश निमसडे तर प्रास्ताविक मुरलीधर बेलखोडे यांनी केले तर आभार सागर मसराम यांनी मानले.