मुख्य मार्गावर मोकाट जनावरांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 11:24 PM2017-10-06T23:24:34+5:302017-10-06T23:24:48+5:30
स्थानिक नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत येथील मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ठरावाअन्वये चर्चा झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : स्थानिक नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत येथील मुख्य मार्गावरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत ठरावाअन्वये चर्चा झाली. परंतु, अद्यापही सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात न आल्याने नागरिकांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर परिस्थिती मोठ्या अपघाताला निमंत्रण देत असल्याने तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी आहे.
जाम-उमरेड हा मार्ग समुद्रपूरच्या मुख्य बाजारपेठेतून जातो. परंतु, दहेगाव चौरस्ता परिसररात दररोज सायंकाळी मोकाट जनावरे थेट रस्त्यावरच ठिय्या देतात. त्यामुळे वाहनचालकांना या मार्गावरून पुढील प्रवास करताना चांगलीच माथापच्छी करावी लागत आहे. बहुतांश वेळा या मार्गावर वाहतूक खोळंबते. इतकेच नव्हे तर चक्क वाहनचालकांना अनेकदा वाहनाबाहेर येऊन रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या मोकाट जनावरांना पळवून लावावे लागते. अनेकदा सदर मोकाट जनावरांना रस्त्यावरून हाकलून लावल्यानंतरही अवघ्या काही मिनीटातच परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे सदर समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांची आहे. मोकाट जनावरे पकडण्यची मोहीम राबविण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नगरपंचायतीबाबत रोष वाढत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वर्ष लोटूनही समस्या जैसे थे
मोकाट जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी ४/८/२०१६ च्या सभेत चर्चा केली. याला वर्ष लोटले. परंतु, अद्यापही समस्या जैसे थेच आहे.
शिवसेनेचे रवींद्र लढी यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने याबाबत ३१ जानेवारी २०१७ ला सदर मोकाट जरावरे हाकलत कोंडवाड्यापर्यंत नेली होती. परंतु, कोंडवाडाच बंद होता.
नगरपंचायतीच्या ४ आॅगस्ट २०१६ च्या सभेत हा प्रश्न आपण लावून धरला होता. त्यावेळी सभागृहात चर्चा झाली. प्रभावी अंमलबजावणीची मागणी यावेळी केली होती. परंतु, बहुमत असतानाही नगरपंचायत पदाधिकाºयांनी अद्याप सदर समस्या निकाली काढली नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
- मधुकर कामडी,गटनेता नगरपंचायत, समुद्रपूर.