मुख्य साक्षदाराला बयान बदलविण्याची धमकी
By admin | Published: April 3, 2016 03:51 AM2016-04-03T03:51:34+5:302016-04-03T03:51:34+5:30
जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे.
रूपेश मुळे नरबळी प्रकरण : शहर ठाण्यात गुन्हा दाखल
वर्धा : जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेत असलेल्या येथील रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला या प्रकरणात साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी मिळाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी शहर ठाण्यात शनिवारी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश मुळे नरबळी प्रकरणात साक्षदारांचे बयान नोंदविण्यात येत आहे. यात रूपेश याला शेवटचा पाहणारा साक्षदार म्हणून कालिदास राऊत याची शनिवारी साक्ष होती. साक्ष देण्याकरिता न्यायालयात येण्यापूर्वी त्याला शुक्रवारी सायंकाळी एका अज्ञात इसमाने भ्रमणध्वनीवर या प्रकरणातील साक्ष बदलविण्यासंदर्भात धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी कालिदास याने सकाळीच पोलीस ठाणे गाठत तशी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम १९५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
साक्ष देण्याकरिता सकाळी कालिदास राऊत न्यायालयात हजर झाले असता त्यांनी न्यायाधीश अरविंद चांदेकर यांना प्रकाराची माहिती दिली. यावर न्यायाधीशांनी पोलिसांना कालिदास यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने कालिदास याची सरतपासणी केली. तर प्रकरणातील मुख्य आरोपी आसिफ खान याचे वकिल शहा यांनी प्रकरणात पुढची तारीख मिळण्याकरिता अर्ज सादर केला. यावर न्यायाधिशांनी त्यांना सोमवारची तारीख दिली. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती शासकीय अभियोक्ता अॅड. श्याम दुबे यांनी दिली.(प्रतिनिधी)
कालिदास राऊत यांना संरक्षण देण्याचे आदेश
प्रकरणातील मुख्य साक्षदार कालिदास राऊत याला धमकी देण्यात आल्याने शहर पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याबाबतचे आदेश न्यायाधीश चांदेकर यांनी ठाणेदारांना दिले आहेत. त्यांच्याकडून तशी सुरक्षा पुरविण्यात येत आहे.
धमकी देणारा ‘तो’ कोण ?
रूपेश मुळे हत्या प्रकरणात साक्षदाराला धमकी दिल्याने या प्रकरणात आणखी कोणी सहभागी असल्याची शक्यता बळावली आहे. कालिदासच्या बयानात त्याचा उल्लेख होण्याची शक्यता असल्याने त्याला तशी धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. यात धमकी देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.