रूपेश मुळे नरबळी प्रकरणातील सरकारी वकील कायम ठेवा
By admin | Published: June 29, 2016 02:08 AM2016-06-29T02:08:49+5:302016-06-29T02:08:49+5:30
शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील....
विविध संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : शहरात घडलेले रूपेश मुळे नरबळी प्रकरण आरोपीच्या बयाणावर आले आहे. अशातच प्रकरण न्यायालयात मांडणारे सरकारी वकील अॅड. श्याम दुबे यांचा सरकारी वकील म्हणून असलेला कार्यकाळ संपला आहे. सदर प्रकरण निकालावर येईपर्यंत किमान या प्रकरणातील सरकारी वकील म्हणून अॅड. श्याम दुबे यांचे नाव कायम ठेवावे, अशी मागणी विविध संघटनांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनातून केली आहे.
रूपेश मुळे नरबळी प्रकरण वर्धा शहरच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजले आहे. एका नऊ वर्षीय बालकाच्या शरीराच्या काही अंगाचे तुकडे करून मांत्रिकाने भाजून खाल्ल्याची ही घटना आहे. या प्रकरणी अॅड. श्याम दुबे यांनी जोरकसपणे बाजू मांडली. त्यामुळे आरोपीस योग्य शिक्षा होईल, असे संकेत असताना त्यातून त्यांना काढून दुसऱ्या वकीलांना बाजू मांडण्यास सांगितल्या गेले. यामुळे या प्रकरणात शंका निर्माण झाल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात योग्य न्याय मिळण्यासाठी अॅड. श्याम दुबे यांनाच पुन्हा नियुक्त करावे, अशी जनतेची मागणी आहे. या संदर्भात शारदा झामरे, प्रा. नुतन माळवी, गजेंद्र सुरकार, सुधीर पांगुळ, विल्सन मोखाडे, भीमसेन गोटे आदींसह नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.
शहरात सप्टेंबर २०१५ मध्ये आर्वी नाका परिसरातील रूपेश मुळे याचा नरबळी दिल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपी अटकेत असून जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे.
सदर प्रकरण सुरू असताना सरकारी वकील म्हणून अॅड. श्याम दुबे यांनी न्यायालयात ते मांडले. येत्या ३० जून रोजी या प्रकरणातील मुख्य साक्षदार शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष असताना अॅड. श्याम दुबे यांचा कार्यकाळ संपला म्हणून त्यांच्या जागी दुसरे सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. मात्र अॅड. दुबे यांनी प्रकरणाची पुरेपूर माहिती असून या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांची नियुक्ती पुन्हा करावी, असे निवेदन सोमवारी सादर करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेअंती जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती निवेदन सादरकर्त्यांनी दिली. निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)