‘मैत्रेय’चा वर्धेकरांना १.७५ कोटींनी गंडा
By admin | Published: May 21, 2017 01:00 AM2017-05-21T01:00:07+5:302017-05-21T01:00:07+5:30
भविष्याची गुंतवणूक म्हणून अनेकांनी त्यांच्या घामाचा पैसा मैत्रये प्लॉटर्स अॅण्ड डेव्हलपर्स या खासगी संस्थेत गुंतविला.
पोलिसांकडे क्विंटलभर तक्रारी : अनेकांच्या घामाचा पैसा अडकला
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भविष्याची गुंतवणूक म्हणून अनेकांनी त्यांच्या घामाचा पैसा मैत्रये प्लॉटर्स अॅण्ड डेव्हलपर्स या खासगी संस्थेत गुंतविला. आपली ठेव दुप्पट होवून मिळेल या आशेत असतानाच सदर कंपनीने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले. या कंपनीवर सेबीने बंदी आणल्याचे समोर येताच वर्धेतील गुंतवणूकदारांच्या पायाखालची वाळूच सरकली. या कंपनीत वर्धेकरांनी तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले. फसवणुकीचे प्रकार समोर येताच वर्धेतही तक्रारींचा ओघ सुरू झाला. आतापर्यंत तब्बल ८ हजार ३०० नागरिकांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्याची माहिती आहे.
मैत्रेय या संस्थेने वर्धेत ३० हजार एजंटच्या माध्यमातून जिल्ह्यात जाळे पसरविले. अनेक आमिषे देत जिल्ह्यातील अनेक धनदांडग्यांसह सर्वसामान्य नागरिक मैत्रेयने आपले ग्राहक करून घेतले. यात वर्धेतील अनेक प्रतिष्ठीतांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून दबक्या आवाजात सांगण्यात येत आहे. यामुळे आणखी तक्रारी आल्या नसल्याचेही बोलले जात आहे. आपल्या इभ्रतीपोटी झाले गेले गंगेला मिळाले, असे त्यांच्याकडून बोलले जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
सेबीने मैत्रेयच्या व्यवहारावर प्रतिबंध घातल्यानंतरही ग्राहकांकडून सदर कंपनीने वेगवेगळ्या योजनांमध्ये पैशाची गुंतवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर पिपरी (मेघे) येथील एका महिलेने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. फसवणुकीची रक्कम कोट्यवधीच्या घरात असल्याने प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात आला. येथे आतापर्यंत क्विंटलभर वजनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यात गुंतविलेला पैसा नागरिकांना परत मिळावा यासाठी महाराष्ट्र ठेवीदार कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
साईनगरात कंपनीची ५९३ चौ.मी.ची मालमत्ता
सेबीने बंदी घातल्यानंतरही ग्राहकांकडून विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून घेणाऱ्या मैत्रेय या कंपनीने ८ हजार ३०० ग्राहकांना १ कोटी ७५ लाखाने गंडा घातल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात उघड झाले आहे. मैत्रेय या कंपनीची वर्धेतील साईनगरात ५९३ चौरस मीटर जागेवर इमारत असून सदर मालमत्ता सील करण्याबाबत पोलिसांकडून अद्याप कुठलीही कार्यवाही केली नाही. किमान तसा प्रस्तावही सादर केला नसल्याची माहिती आहे.
पहिली तक्रार महिला पोलीस कर्मचाऱ्याची
पिपरी (मेघे) भागातील रहिवासी असलेल्या एका महिलेने मैत्रेय कंपनीबाबत सर्वप्रथम रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. सदर महिला दुसरी कुठली नसून पोलीस विभागात कार्यरत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.