विमा क्लेम करून वर्ष लोटूनही नातेवाइकांच्या बँकेत चकरा; साहेबांकडून मात्र उत्तर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 18:13 IST2025-02-26T18:12:05+5:302025-02-26T18:13:34+5:30

वर्षभरापूर्वी केला क्लेम : अद्याप लाभ मिळाला नाही

make an insurance claim and relative's go bank for years; But there is no answer from an officials | विमा क्लेम करून वर्ष लोटूनही नातेवाइकांच्या बँकेत चकरा; साहेबांकडून मात्र उत्तर नाही

make an insurance claim and relative's go bank for years; But there is no answer from an officials

चेतन बेले 
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
सर्वसामान्यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने अपघाती, तसेच आकस्मिक मृत्यूसाठी नाममात्र दरात विम्याचे कवच उपलब्ध करून दिले. लाखो नागरिकांनी विमाही उतरविला. मात्र, मृत्यूपश्चात विमा क्लेम बैंकेत दाखल केल्यानंतर वर्ष लोटूनही मृतकाच्या वारसदाराला विम्याची रक्कम अद्याप उपलब्ध झालेली नसल्याने नातेवाइकांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहे. हा प्रकार शहरालगत असलेल्या सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या शाखेत सुरू आहे. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांसाठी मृगजळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.


विमा कंपनीकडून अपघाती निधन तसेच आकस्मिक निधन आदींसाठी विमा हवा असल्यास मोठा प्रिमियम भरावा लागत होता. प्रत्येकाला तो प्रिमियम भरणे शक्य नसल्याने केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना सुरू केली. अल्प रक्कम भरणे सहज शक्य असल्याने सालोड येथील नागरिकांनी विमा उरवून घेतला होता. दरम्यान चौघांचा आकस्मिक मृत्यू, तर एकाचा अपघाती मृत्यू झाला. यासाठी त्यांनी बँकेला आवश्यक कागदपत्राचा पुरवठाही केला. मात्र, याला वर्ष उलटले. मात्र, अद्याप क्लेमची रक्कम उपलब्ध झाली नाही. शिवाय काय त्रुटी आहे, तेही सांगण्यात न आल्याने बँकेच्या निव्वळ चकरा माराव्या लागत असल्याने मृताच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 


७.९७ लाख जणांनी घेतले जिल्ह्यात विम्याचे कवच
जिल्ह्यातील २३ राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतील तब्ब्ल ७ लाख २७ हजार ३६८ ग्राहकांनी विम्याचे कवच उतरवून घेतले आहे. यात प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे २ लाख ५९ हजार १२० तर सुरक्षा विमा योजनेचे ५ लाख ३८ हजार २४८ लाभार्थी असल्याची नोंद आहे.


सांगा आता साहेब आणखी किती दिवस वाट बघावी लागणार
सालोड येथील अरविंद बाके, राजू झाडे, दीपक मोहिजे व अन्य एकाचा आकस्मिक मृत्यू झाला, तर आकाश मांजरे या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला.
या मृतांच्या नातेवाइकांकडून बँकेत क्लेमसाठी अर्जही दाखल केले. मात्र, वर्षभरापासून त्यांना बँकेकडून केवळ पाठपुरावा सुरू असल्याशिवाय दुसरे उत्तर दिले जात नाही.


त्यामुळे आणखी किती दिवस वाट पाहावी, असा प्रश्न मृतांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. नातेवाइक बँकेच्या चक्करा मारून बेजार झाले आहेत. तरीही त्यांना आद्यापही विमा क्लेम मिळाला नाही. वेळेवर विमाचा लाभ मिळल नसेल तर तो विमा काय कामाचा अशा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


क्लेमसंदर्भात नोंदीच नाही?
जिल्ह्यात २३ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात उपशाखा आहे. विमा उतरविणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना अपघाती, तसेच आकस्मिक मृत्यू झाला. त्या नातेवाइकांनी संबंधित बँकेत क्लेमही दाखल केले. मात्र, एक दोन अपवादात्मक प्रकरण वगळता कुणालाही क्लेम मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. किती जणांना बँकेने क्लेम दिले, किंवा किती दाखल झाले याच्या नोंदी जिल्हा अग्रणी बँकेकडेही नसल्याचे सांगण्यात आले आहे.


१४७ राष्ट्रीयीकृत बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात शाखा
राष्ट्रीयीकृत बँकेच्या एका शाखेत ५ क्लेम वर्षभरापासून पेंडींग आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या अशा १४७ शाखा असून नेमकी पेंडन्सी किती? असा प्र श्न उपस्थित होत आहे.


"जिल्ह्यात ७.९७ लाख ग्राहकांनी बँकेतून विमा काढला आहे. यात अपघाती, तसेच आकस्मिक मृत्यूसाठी क्लेमही दिले आहेत. मात्र, किती जणांना आतापर्यंत दिले, याची नोंद नाही. शिवाय किती क्लेम दाखल झाले याचीही नोंद नाही. त्यामुळे नेमकी आकडेवारी सांगता येणार नाही."
- चेतन शिरभाते, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बैंक, वर्धा.


"क्लेमसंदर्भात मृतांचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे. महिन्याच्या प्रत्येक मिटिंगला या प्रस्तावाबाबत माहिती घेतो. मात्र, त्यावर ठोस उत्तर दिले जात नाही. ऑनलाइन सिस्टम असली तरी यात ट्रॅकिंग सिस्टम नसल्याने क्लेमसंदर्भात ठोस उत्तर देता येत नाही."
- अनिल राऊत, प्रबंधक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, शाखा सालोड.

Web Title: make an insurance claim and relative's go bank for years; But there is no answer from an officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.