मुलभूत आपत्कालीन सेवेचे प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करा; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एमसीआयला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:21 PM2017-11-29T14:21:13+5:302017-11-29T14:22:08+5:30
भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, असे निर्देश एमसीआयला दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव अमित बिश्वास यांनी दिली.
प्रशांत हेलोंडे।
आॅनलाईन लोकमत
वर्धा : भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, असे निर्देश एमसीआयला दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव अमित बिश्वास यांनी दिली.
महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय न्यायवैद्यक विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी मुलभूत आपत्कालीन सेवा व वैद्यकीय अभ्यासक्रमाचा खालावलेला दर्जा याचे सविस्तर वर्णन करणारा ३३ पानी अहवाल २०१३ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कार्यवाहीसाठी पाठविला होता. त्यावेळी मानवाधिकार आयोगाने आरोग्य मंत्रालयाला या अहवालावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. असे असले तरी कार्यवाही मात्र झाली नाही. इतकेच नव्हे तर मुलभूत आपत्कालीन सेवा व प्राथमिक उपचार देण्यास वैद्यकीय विद्यार्थी सक्षम आहे वा नाही, हे समजून घेण्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी, कुठल्या विभागाने घ्यावी, कुठली पद्धत वापरावी याबाबत निर्देशही एमसीआयने आरोग्य विद्यापीठांना १९९७ पासून दिलेच नाही. यामुळे मुलभूत आपत्कालीन सेवेसाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता देशातील वैद्यकीय महाविद्यालये वैद्यकीय विद्यार्थ्यांना सक्षम व तज्ज्ञ म्हणून घोषित करीत असल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे सविस्तर अहवाल कार्यवाहीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरोग्य मंत्री जगत नड्डा यांना पाठविला होता. यावरून हे निर्देश देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
योग्य आपत्कालीन सेवेअभावी लाखो मृत्यू
देशातील आपत्कालीन सेवेचा खालावलेला दर्जा व एमबीबीएस डॉक्टरांकडून योग्य आपत्कालीन सेवा न मिळाल्याने होणारे लाखो मृत्यू याची कारणे शोधण्यासाठी डॉ. खांडेकर, विद्यार्थी मोहिनी नादागौडा व शुभांगी कुंवर यांनी एमसीआयकडून आरटीआय अंतर्गत माहिती घेतली. यात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना १९९७ पासून प्रात्यक्षिक परीक्षा व योग्य प्रशिक्षणाविना मुलभूत आपत्कालीन सेवा, कार्डीओ-पलमोनरी-रिसूसायटेशन (सीपीआर) व प्राथमिक उपचार (फर्स्ट एड) देण्यास सक्षम घोषित केले गेले. वैद्यकीय अभ्यासक्रम याबद्दल स्तब्ध असल्याचा आश्चर्यजनक खुलासाही एमसीआयने केला होता.
आरोग्य मंत्रालयाच्या या निर्देशामुळे वैद्यकीय शिक्षणात आपत्कालीन सेवेच्या प्रशिक्षणाबाबत २० वर्षांपासून होत आलेली घोडचूक सुधारण्यासाठी एमसीआय लवकरच पावले उचलेल. परिणामी, मुलभूत आपत्कालीन सेवा देण्यास योग्य प्रशिक्षित व परिपक्व डॉक्टर तयार होण्यास मदत होईल.
- प्रा.डॉ. इंद्रजीत खांडेकर, न्यायवैद्यक विभाग, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.
वैद्यकीय डॉक्टरांचे मुलभूत आपत्कालीन सेवेबद्दलचे कौशल्य व ज्ञान कमी आहे. बºयाच रुग्णांचे मृत्यू अप्रशिक्षित व अपरिपक्व डॉक्टरांकडून योग्य मुलभूत आपत्कालीन सेवा न मिळाल्याने होत आहे. तत्सम पुरावेही उपलब्ध आहेत.
- मोहिनी नादागौडा, विद्यार्थिनी, म.गांधी वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम.