जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:06 PM2018-10-15T22:06:52+5:302018-10-15T22:07:09+5:30
सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सरासरीपेक्षा कमी पाऊस यंदा वर्धा जिल्ह्यात पडला. शिवाय पावसाळा संपला असून सुद्धा जिल्ह्यातील मोठ्यासह छोटे जलाशये सध्या तळ दाखवत आहेत. सध्या सोयाबीन पिकाची मळणी शेतकरी करीत असून उतारेही कमी येत आहेत. जमिनीतील ओलावा पूर्वी सारखा नसल्याने रबी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी जेष्ठ नागरिक सेवा महासंघाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यातील जलाशयातील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ न झाल्याने जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरातील नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना आक्टोबर महिन्यातच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने नैसर्गीक पानवटेही अल्पावधीत आटणार आहेत. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. अल्प पावसाचा विविध शेत पिकांना फटका बसला असून सध्या सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. शिवाय कपाशी आणि तूर हे पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व बाजूंचा अभ्यास करून वर्धा जिल्ह्याला दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून जाहीर करावा तसेच शेतकºयांना सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना रामभाऊ सातव, गंगाधर पाटील, सुधाकर मेहरे, प्रल्हाद गिरीपुंजे, गणपत मेटकर, अमृत मडावी, रमेश खेडकर, ज्ञानेश्वर वैद्य, भक्तराज अलोणे आदींची उपस्थिती होती.